नवी दिल्ली : २०१७ च्या महिला विश्वचषकानंतर सर्व जगात महिलांच्या क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे. ही लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी क्रिकेट काउंसिल वुमेन चैंपियनशिप दुसऱ्या हंगामाचे आयोजन करीत आहे. दिल्लीमध्ये भारतीय कर्णधार मिताली राजने आयसीसी महिला चॅम्पियनशिपचे दुसऱ्या सत्राची घोषणा केली आहे.  या स्पर्धेमुळे इतर संघांना २०२१ च्या विश्वचषक स्पर्धेत आपले स्थान पक्के करता येणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया,इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी पहिल्या हंगामात भाग घेतला आहे. या संघांव्यतिरिक्त पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडीजही या मोसमात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत अव्वल तीन स्थानांवर असणार्या सर्व संघांना २०२१ महिला विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल.


यानंतर, उर्वरित चार संघांना आफ्रिका, आशिया, पूर्व आशिया आणि युरोपमधील ६ टीमसोबत क्वालिफायरच्या फेरीत प्रवेश करावा लागणार आहे. या स्पर्धेबद्दल भारतीय संघाच्या कर्णधाराने आनंद व्यक्त केला आहे.चॅम्पिअनशिप ही महिला क्रिकेटसाठी उत्तम असून या स्पर्धेमुळे जगभरातील खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्पर्धा अधिक कठीण बनली असून रोमांचक सामने पाहायला मिळणार असल्याचे मिताली राजने सांगितले. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या अंतर्गत, पहिल्या तीन मॅचची वन डे सिरीज वेस्टइंडीज आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. पुरुषांच्या टीमप्रमाणे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान वुमेन अॅशेज सिरीज खेळविली जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानी दौऱ्यावर जाईल. तर भारतीय संघ जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिका खेळणार आहे.