World Cup 2019 : #NZvIND सामन्यामुळे सट्टा बाजारात तेजी; `या` संघाला बुकींची पसंती
अशी आहेत ही गणितं.....
मुंबई : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना मंगळवारी मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाचं आव्हान स्वीकारत भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहे. क्रीडा विश्वासह इतर क्षेत्रांमध्येही या सामन्याविषयीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे फक्त मैदानातच नाही, तर सट्टा बाजाराचंही या सामन्याकडे लक्ष लागून राहिलेलं असणार आहे. बरीच आर्थिक उलथापालथ या सामन्याच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
'बिझनेस स्टँडर्ड'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सट्टा लावणाऱ्यांक़डून भारतीय संघाला पसंती दिली जात आहे. मंगळवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ जिंकण्याच्या भाकीतावर अनेकांनी पैसा लावल्याचं कळत आहे. तर, विश्वचषक विजयासाठीसुद्धा सट्टा लावणाऱ्यांकडून भारतीय क्रिकेट संघालाच पसंती दिली जात असल्याचं लक्षात येत आहे.
फक्त गुणतालिकेतच नव्हे, तर सट्टा बाजारामध्येसुद्धा पसंती मिळणारा संघ म्हणून भारताच्या संघाचं नाव पुढे येत आहे. Ladbrokes आणि Betway यांसारख्या संकेतस्थळांचा संदर्भ देत काही आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. Ladbrokesवर सध्या भारत १३/८, इंग्लंड १५/८, ऑस्ट्रेलिया ११/४ आणि न्यूझीलंड ८/१ असं प्रमाण निश्चित करण्यात आलं आहे. तर, Betwayवरही यंदाच्या वर्षीचा विश्वचषक भारतीय संघानेच जिंकावा असा कल दिसत आहे. या ठिकाणी भारत २.८, इंग्लंड ३, ऑस्ट्रेलिया ३.८ आणि न्यूझीलंड ९.५ अशा प्रमाणात सट्ट्याची गणितं असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
नेमकं काय आहे हे गणित?
सोप्या भाषेत सांगावं तर, १३/८ म्हणजे १३ भागिले ८. तेव्हा जर तुम्ही भारताच्या संघावर सध्याच्या प्रमाणात म्हणजेच १३/८ चा सट्टा लावलात, तर तुम्ही लावलेली किंमत ही १३ने गुणली जाणार आणि ८ ने त्याचा भागाकार होणार. त्यानंतर येणाऱ्या किंमतीमध्ये तुम्ही सट्टा लावलेल्या किंमतीचा आकडा जोडला जाणार.
उदाहरणार्थ :
सट्टा लावलेली किंमत १,००,०००
सध्याची किंमत - १३/८
त्यामुळे जर तुम्ही जिंकलात तर,
(१,००,००० x १३)/ ८ + १,००,००० = २,६२,५००
काही संकेतस्थळांवर या जिंकलेल्या किंमतीवरही नफ्याची किंमत कापली जाते. त्यामुळे ही बाब लक्षात घेणंही महत्त्वाचं
'या' खेळाडूंना सट्टेबाजारात पसंती
भारतीय क्रिकेट संघात फलंदाजांच्या फळीची दणक्यात सुरुवात करुन देणाऱ्या रोहित शर्माला सट्टा लावणाऱ्यांकडून जास्त पसंती मिळण्याची चिन्हं आहेत. तर, या शर्यतीत विराट कोहलीच्याही नावाचा समावेश आहे. हे एकंदर चित्र पाहता सामना नेमका कोणत्या वळणावर जाणार यावरही सट्ट्याची गणितं आधारलेली आहेत. त्यामुळे ही रंगत फक्त मैदानातच नव्हे तर सट्टेबाजारातही आहे हे खरं.