World Cup 2019 : उपांत्य फेरीत `या` संघासह भारताची लढत; लक्ष्य फक्त एकच....
या दिवशी पार पडणार उपांत्य सामने...
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वचषकाची रंगत सुरु झाल्या दिवसापासून वाढतच आहे. असतानाच साखळी सामने आणि बाद फेरीनंतर यंदाच्या विश्वचषकाची रंगत ही उपांत्य फेरीपर्यंत येऊन थांबली आहे. क्रिकेट विश्वावर अधिपत्य प्रस्थापित करत मानाच्या चषकावर मोहोर उमटवण्यासाठी चार आघाडीच्या संघांमध्ये दोन उपांत्य सामने खेळले जाणार आहेत. ९ जुलै या दिवशी मँचेस्टर तर, ११ जुलै रोजी बर्मिंघम येथे हे सामने पार पडणार आहेत. तर, १४ जुलै रोजी यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा धडाका पाहता येणार आहे.
यंदाच्या विश्वचषकातील उपांत फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी धडक मारली आहे. क्रिकेट विश्वचषकात सातवा विजय मिळवत आणि श्रीलंकेच्या संघाला नमवत भारताच्या संघाने गुणतालिकेतही बाजी मारली आहे. त्यामुळे आता या 'विराटसेने'चं एकच लक्ष्य असणार आहे... आणि ते म्हणजे विश्वविजेतेपद मिळवण्याचं.
असे पार पडतील उपांत्य सामने
प्रथम उपांत्य सामना
-भारत विरुद्ध न्यूझीलंड, मंगळवार, ९ जुलै २०१९
गुणतालिकेत प्रथम स्थानी असणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत आव्हान असणार आहे न्यूझीलंड संघाचं. मंगळवारी हा सामना पार पडणार आहे. दोन्ही संघांमध्ये होणारी लढत ही तुल्यबळ असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. या संघांची विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी पाहता हा अंदाज लावण्यात आला आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघातील खेळाडूंचा फॉर्म पाहता न्यूझीलंडच्या संघापुढे हे एक आव्हान असणार आहे. रोहित शर्माची खेळी पाहता न्यूझीलंडच्या संघापुढे तो उभा ठाकणार आहे. तर, न्यूझीलंडच्या संघातूनही केन विलियमसन हासुद्धा भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेऊ शकतो.
दुसरा उपांत्य सामना
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गुरुवार, ११ जुलै
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा उपांत्य सामनाही पाहण्याजोगा असेल. दोन्ही संघांमध्ये असणारी स्पर्धा पाहता प्रत्येक खेळाडूचं कौशल्य पणाला लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर गुणतालिकेत अग्रस्थानी असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ थेट दुसऱ्या स्थानावर आला. ज्यामुळे आता त्यांचा सामना तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या इंग्लंडशी होणार आहे. मॉर्गनचा संघ आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर मात करण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ऍरॉन फिंच आणि वॉर्नर यांच्या फलंदाजीचा मारा इंग्लंडच्या गोलंदाजांना सहन करावा लागणार आहे. तर, यजमानांच्या संघातून जो रूट आणि जॉनी बेअरस्टोचं तगडं आव्हान ऑस्ट्रेलियापुढे असणार आहे. तेव्हा आता या दोन्ही उपांत्य सामन्यांतून नेमके कोणते दोन संघ अंतिम सामन्यात धडक मारणार याकडेच साऱ्या क्रिकेट विश्वाचं आणि क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं आहे.