Rohit Sharma ने इतिहास रचला, विश्वचषक स्पर्धेत `हा` मोठा विक्रम केला नावावर
World Cup 2023, Semi Final-1: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिली सेमीफायनल खेळवली जात आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे.
World Cup 2023, Semi Final-1: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान (India vs New Zealand) पहिली सेमीफायनल (World Cup Semifinal) खेळवली जात आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भारताच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्याच षटकापासून तुफान फटकेबाजी सुरु केली. या स्पर्धेत रोहित शर्माने इतिहास रचला आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा झाला आहे. रोहित शर्माने विश्वचषकात 50 षटकार लगावलेत. या आधी हा विक्रम वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता. ख्रिस गेलने विश्वचषकात 49 षटकार लगावलेत. या सामन्याच्या आधी रोहित शर्माच्या खात्यात 47 षटकार होते. पण फलंदाजीला उतरताच रोहित शर्माने पहिल्या पाच षटकातच चार षटकार लगावत ख्रिस गेलचा विक्रम मागे टाकला. रोहित शर्माने एकूण 51 षटकार लगावलेत.
रोहित शर्माचं अर्धशतक हुकलं
न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये रोहित शर्माने दमदार सुरुवात केली. पण त्याचं अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. रोहित शर्माने अवघ्या 29 चेंडूत 47 धावा केल्या. यात त्याने चार खणखणीत षटकार आणि चार चौकार लगावले. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर केन विल्यम्सनने रोहित शर्माचा बाऊंड्रीवर जबलदस्त झेल टिपला. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माने 10 सामन्यात 550 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
विश्वचषकाबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने एकदिवसीय, कसोटी आणि टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीवर अव्वल स्थानावर आहे.
1. रोहित शर्मा (भारत) - 571 षटकार
2. ख्रिस गेल (वेस्टइंडीज) - 553 षटकार
3. शाहिद अफरीदी (पाकिस्तान) - 476 षटकार
4. ब्रँडन मॅक्कुलम (न्यूजीलंड) - 398 षटकार
5. मार्टिन गप्टिल (न्यूजीलंड) - 383 षटकार
6. महेंद्र सिंह धोनी (भारत) - 359 षटकार
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतकं
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. रोहित शर्माच्या नावावर विश्वचषक स्पर्धेत तब्बल सात शतकांचा रेकॉर्ड आहे.. विश्वचषक स्पर्धेत सचिनने सहा शतकं केली होती. तर रिकी पॉण्टिंग -5, कुमार संगकारा -5 आणि डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 4 शतकं होती.