ICC World Cup 2023 India vs Pakistan Date Time Venue: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 2023 साली आयोजित केल्या जात असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सामन्याच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे.


भारत पाकिस्तान सामन्याचा रेकॉर्ड काय सांगतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तानदरम्यान 132 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 55 सामने भारताने तर 73 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. यापैकी 4 सामन्यांचा कोणताही निकाल लागलेला नाही. भारताने घरगुती मैदानावर 11 वेळा पाकिस्तानला पराभूत केलं आहे. तर पाकिस्तानने त्यांच्याच मैदानांवर भारताला 19 वेळा नमवलं आहे. परदेशी खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये भारताने 33 तर पाकिस्तानने 40 वेळा भारतावर विजय मिळवल्याचं माय खेलची आकडेवारी सांगते. 


आयसीसीच्या स्पर्धांमधील रेकॉर्ड कसा आहे?


भारत आणि पाकिस्तानचा संघ एकूण 7 वेळा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले आहेत. सातही वेळा भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने 4 वेळा पाकिस्तानला धूळ चारली आहे. तर पाकिस्तानने भारताला एकदाच पराभूत केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानचं पारडं जड आहे. पाकिस्तानने भारताला 3 वेळा पराभूत केलं आहे. तर भारताला या स्पर्धेत 2 वेळा यश आलं आहे. एकंदरित आयसीसीच्या स्पर्धांमधील रेकॉर्ड पाहिला तर भारत पाकिस्तानमध्ये एकूण 18 सामने झाले असून त्यापैकी 13 सामने भारताने जिंकले आहेत.


भारताने दोनदा तर पाकिस्ताने एकदा जिंकलाय विश्वचषक


एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमधील सर्वात यशस्वी संघ हा ऑस्ट्रेलियाचा आहे. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारत आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी 2 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि या खेळाचा जनक असलेल्या इंग्लंडने प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली तर 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकली. भारताला मागील अनेक वर्षांपासून आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अपयशाचं तोंड पहावं लागलं आहे. त्यामुळे यंदाचा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक जिंकून हा विजयाचा दुष्काळ संपवण्याचा भारतीय संघाचा इरादा असेल.