World Cup: इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, `या` खेळाडूला संधी
IND vs ENG CWC 2023: भारत आणि इंग्लंड दरम्यान येत्या रविवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला लखनऊच्या भारतीरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. या सामन्यासाटी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात काही बदल करण्याची शक्यता आहे.
India Playing 11 vs England World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाची (Team India) विजयी घोडदौड सुरु आहे. सलग पाच सामने जिंकलेली टीम इंडिया आता सहाव्या विजयासाठी सज्ज झालीय. 29 ऑक्टोबरला भारताचा सामना इंग्लंडशी (India vs England) होणार आहे. लखनऊच्या भारतीरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा संघात काही बदल करण्याची शक्यता आहे.
प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार
हार्दिक पांड्याची दुखापत आणि शार्दुल ठाकूरच्या खराब फॉर्ममुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात या दोघांना बाहेर बसवण्यता आलं होतं. त्यांच्याऐवजी सूर्यसुमार यादव आणि मोहम्मद शमीला संधी देण्यात आली. हार्दिक पांड्या पुढचे तीन सामने खेळणार नसल्याने बीसीसीआने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध उतरवण्यात आलेली प्लेईंग इलेव्हनच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कायम राहिल अशी शक्यता आहे.
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने प्लेईंग इलेव्हनबाबत एक सल्ला दिला आहे. लखनऊची खेळपट्टी धीमी असून फिरकीला साथ देणारी आहे. अशात टीम इंडियामध्ये तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात यावा असं हरभजन सिंगने म्हटलं आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या जोडीला आर अश्विनला संघात घेण्याचा सल्ला हरभजनने दिलाय. विशेष म्हणजे हरभजन सिंगने मोहम्मद सिराजला आराम देण्याचा सल्ला दिला आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवण्यावरही हरभजनने भर दिला आहे.
सूर्या, शमी संघात
हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर सूर्यकुमारला संधी देण्यात आली. पण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सूर्या केवळ दोन धावा करुन दुर्देवीरित्या रनआऊट झाला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवमध्ये एक धाव घेताना गैरसमज झाला आणि सूर्या बाद झाला. सूर्यकुमारचं वर्ल्ड कप पदार्पण दुर्देवी ठरलं. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीची संघातील जागाही पक्की आहे.
भारत-इंग्लंड हेड टू हेड
भारत आणि इंग्लंडदरम्यान आतापर्यंत 106 एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. यात भारताने तब्बल 57 सामन्यात विजय मिळवलाय तर इंग्लंडने 44 सामन्यात भारतावर मात केलीय. दोन सामने टाय झाले तर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात मात्र इंग्लंडचं पारडं जड आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान आतापर्यंत आठ सामने खेळवण्यात आलेत. यातल्या तीन सामन्यात भारत तर चार सामन्यात इंग्लंड विजयी झालाय. एक सामना टाय झाला.
भारताची इंग्लंडविरुद्ध संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी