Pakistan Cricket Team : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाची  (Pakistan Cricket) अवस्था बिकट झाली आहे. भारतात खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला पाचैपकी तब्बल तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. पण पाकिस्तानाला सर्वात मोठा धक्का ठरला तो अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव. अफगाणिस्तानने पाकिस्तानचा तब्बल 8 विकेटने पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  याच दरम्यान पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेल्फीमुळे नसीम शाह बाहेर?
पाकिस्तानाचा स्टार गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) आयसीसी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर आहे. दुखापतीमुळे त्याला विश्वचषक स्पर्धेला मुकावं लागलं. पण दुखापतीचं केवळ कारण असून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्यासोबत सेल्फी काढल्याने नसीम खानला पाकिस्तान संघातून बाहेर काढण्यात आलं, अशी चर्चा सुरु झाली आहे. इमरान खान सध्या पाकिस्तानमधल्या तुरुंगात आहेत. त्याआधी एका कार्यक्रमात इमरान खान आणि नसीम शाह सहभागी झाले होते, यावेळी नसीन शाहने इमरान खानबरोबर सेल्फी काढला. हाच सेल्फी त्याच्या संघातून बाहेर जाण्याला कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. 


पाकिस्तानमधल्या टीव्ही चॅनेलचा व्हिडिओ
पाकिस्तानमधल्या टिव्ही चॅनेलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि लेखक अयाज मेमन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार डॉ. नोमान नियाज यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. नसीम खानने इरमान खान यांच्यासोबत सेल्फी काढल्याने त्याला परिणाम भोगावे लागले का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी या शक्यतेचा इन्कार केला आहे. इमरान खान यांच्याबरोबरच्या सेल्फीचा आणि नसीम शाहच्या न खेळण्याचा काहीही संबंध नाही असं नोमान नियाज यांनी म्हटलंय.


नसीम शाह खरोखरच दुखापतग्रस्त आहे. एशियाकपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात नसीम शाहच्या खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याने त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. स्वत: नसीन शाहने रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. सातत्याने खेळल्याने नसीन शाहच्या दुखापतीने गंभीर स्वरुप धारण केलं आहे, त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचंही नोमान नियाज यांनी सांगितलं. त्यामुळे इमरान खानबरोबरच्या सेल्फीचं कारण केवळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं.


पाकिस्तान सेमीफायनलमधून बाहेर?
दरम्यान, आयसीसी विश्वचषकात पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत वाईट होतेय. पाचपैकी तीन सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तान सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही कमी हात चालली आहे. सेमीफायनलमध्ये एन्ट्री करण्यासाठी पुढचे सर्व चारही सामने पाकिस्तानला जिंकावे लागणार आहेत.