मुंबई : येत्या आयपीएलमध्ये 10 संघाचा समावेश करण्यात येणार आहे. याच बातम्यांमध्ये आता क्रिकेटर सुरेश रैनाने एक मोठा खुलासा केला आहे. क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी आणि माजी डावखुरा फलंदाज सुरैश रैना हे फार चांगले मित्र आहे. या दोघांनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. दरम्यान आता रैनाने धोनीविषयी एक मोठी प्रतिक्रिया दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर पुढच्या वर्षी धोनी आयपीएलमध्ये खेळणार नसेल तर आपणंही खेळणार नाही असं मोठं वक्तव्य सुरेश रैनाने केलं आहे. धोनी आणि रैना हे चैन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीचे दोन महत्त्वाचे खेळाडू आहेत. आयपीएल 2008 पासून हे दोघे चेन्नई फ्रेंचायझीसाठी एकत्र खेळले आहेत. नुकतंच धोनीने त्याचा 40वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान यंदाच्या आयपीएलचा हा त्याचा शेवटचा सिझन असल्याची सध्या चर्चा सुरु आहेत.


न्यूज 24 स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत रैना म्हणाला, "जर धोनी आगामी आयपीएल सिझनचा भाग नसेल, तर मलाही आयपीएलचा पुढचा सिझन खेळण्याची इच्छा नाहीये. आम्ही 2008 पासून एकत्र खेळत आलोय. जर आम्ही यंदा आयपीएल जिंकू शकलो, तर मी पुढच्या सिझनमध्ये खेळण्यासाठी त्याला विनंती करू शकतो.”


आयपीएलच्या पुढील सिझनमध्ये दोन नवीन संघांची भर होणार आहे. रैना पुढे म्हणाला, "पुढच्या सिझनमध्ये अजून दोन नवीन संघ येत आहेत. पण मला चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळण्याची इच्छा आहे. मला आशा आहे की, या स्पर्धेत माझी कामगिरी चांगली होईल.”


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 4 मे रोजी आयपीएल 2021 पुढे ढकलण्यात आली होती. तर आता सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा पुन्हा सुरू होईल आणि त्याचा अंतिम ऑक्टोबरमध्ये होणार आहे. आयपीएल 2021चे उर्वरित सामने 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 1 ऑक्टोबरला होणार आहे.