मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. वसीम अक्रमने मला मॅच फिक्सिंगची ऑफर दिली असती, तर मी त्याचा खून केला असता, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. '१९९० च्या दशकात वसीम अक्रम अशक्य परिस्थितीमधून पाकिस्तानला जिंकवून देताना मी पाहिलं आहे,' असं शोएब अख्तर म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वसीम अक्रमने जर मला मॅच फिक्सिंगची ऑफर दिली असती, तर मी त्याचा खून केला असता. पण त्याने अशी कोणतीही गोष्ट माझ्यासमोर बोलून दाखवली नाही.वसीमने माझ्या सुरुवातीच्या काळात खूप मदत केली,' असं शोएबने सांगितलं.


'वसीम अक्रमसोबत मी ७-८ वर्ष खेळलो. अनेक वेळा वसीम अक्रमने सुरुवातीच्या विकेट घेऊन मला तळाच्या खेळाडूंच्या विकेट घ्यायचं सोपं काम दिलं. एवढच नाही तर वसीमने मला माझ्यासाठी सोयीच्या एन्डने बॉलिंगही करायला दिली,' अशी प्रतिक्रिया शोएबने दिली.


शोएब अख्तरने पाकिस्तानकडून ४६ टेस्टमध्ये १७८ विकेट, १६३ वनडेमध्ये २४७ विकेट आणि १५ टी-२०मध्ये १९ विकेट घेतल्या. काहीच दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये वनडे सीरिज खेळवण्याची मागणी केल्यामुळे शोएब अख्तर वादात सापडला होता.


कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी निधी गोळा करायचा असेल, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ वनडे मॅचची सीरिज खेळवण्यात यावी. या सीरिजमधून मिळालेला निधी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी कोरोनाशी लढण्यासाठी समसमान वापरावा, अशी मागणी शोएब अख्तरने केली होती.