पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटातून सुवर्णपदकाची कमाई करणारी अल्जेरियाची बॉक्सर इमान खलीफने (Imane Khelif) मेडिकल रिपोर्ट लीक झाल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. मेडिकल रेकॉर्ड लीक झाल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय तिने घेतला असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिली आहे. फ्रान्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अल्जेरियन बॉक्सरमध्ये अंतर्गत अंडकोष आणि XY गुणसूत्र आहेत. अहवालानुसार, 5-अल्फा रिडक्टेज नावाच्या विकाराचे संकेत देत आहेत. फ्रेंच पत्रकार Djaffar Ait Aoudia यांना हा अहवाल प्राप्त झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इमान खलीफने अँजेला कॅरिनीला फक्त 46 सेकंदात पराभूत केल्यानंतर तिच्या लैंगिकतेवरुन वाद सुरु झाला होता. अँजेलाने नाकाला गंभीर दुखापत झाल्यानंतर पराभव स्विकारला होता. यानंतर वाद पेटला होता आणि अनेकांनी इमानच्या लैंगिकतेवर प्रश्न उपस्थित केला होता. इटलीच्या पंतप्रधानांनीही यावर भाष्य केलं होतं. 


IOC ने एका निवेदनात म्हटलं आहे की, "पॅरिस 2024 च्या ऑलिम्पिक गेम्स दरम्यान तिच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या व्यक्तींवर इमान खेलीफने कायदेशीर कारवाई केली आहे आणि सध्याच्या ताज्या अहवालासंदर्भात खटला दाखल करण्याची तयारी करत असल्याचं समजत आहे".



"कायदेशीर कारवाई चालू असताना किंवा ज्यांच्या मूळची पुष्टी करता येत नाही अशा मीडिया रिपोर्ट्सवर आम्ही टिप्पणी करणार नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे. खलीफने 2021 मधील टोकियो ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (IBA) जागतिक चॅम्पियनशिप आणि IBA-मंजूर स्पर्धांमध्ये अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महिला गटात भाग घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सध्या इमानला मिळत असलेल्या गैरवर्तनामुळे ते दुःखी असल्याचं सांगितलं आहे. खलीफने यापूर्वीच फ्रान्समध्ये ऑनलाइन छळाची तक्रार दाखल केली आहे.