`तू असं काय केलं की...`, KL Rahul मैदानात येताच ऑस्ट्रेलियन खेळाडूने डिवचलं; स्टम्प माईक रेकॉर्डींग Viral
Lyon Taunt KL Rahul Watch Video: के. एल. राहुल मैदानात उतरुन क्रिजवर पोझिशन घेत असतानाच काय घडलं जाणून घ्या...
Lyon Taunt KL Rahul Watch Video: ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकीपटू नेथन लायनने भारताचा फलंदाज के. एल. राहुलचं स्लेजिंग केल्याचं बॉक्सिंग डे कसोटीमध्ये दिसून आलं. फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये के. एल. राहुलला खालच्या क्रमाकांवर पाठवण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन नेथन लायनने डिवचल्याचं पाहायला मिळालं. नेथन लायन के. एल. राहुलला नेमका काय म्हणाला हे स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं असून हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या एका निर्णयावरुन नेथन लायनने के. एल. राहुलला टोमणा मारत खोचक सवाल केल्याचं दिसून आलं.
मैदानात उतरल्यानंतर लगेच बाजूला आला अन्...
के. एल. राहुल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा भारताची एका विकेट आधीच पडली होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी के. एल. राहुल मैदानात उतरल्यानंतर तो क्रिजवर गार्ड घेत होता म्हणजेच पोझिशन घेत असतानाच नेथन लायन त्याच्या जवळ आला. त्यानंतर के. एल. राहुल जवळून जाताना नेथन लायनने एक प्रश्न विचारला.
नेथन लायन के. एल. राहुलला म्हणाला की, 'तू असं काय...'
के. एल. राहुल हा मागील काही काळापासून फार चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. त्याने शुक्रवारी 47 धावा केल्या. भारताला दुसऱ्या दिवशी 235 धावा करता आल्या. त्यापैकी सर्वाधिक वैयक्तिक धावा के. एल. राहुलच्याच होत्या. सलामीवीर म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. मात्र एका चुकीचा फटका खेळून रोहित शर्मा 5 बॉलमध्ये 3 धावा करुन डावाच्या दुसऱ्या ओव्हरलाच तंबूत परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळणार के. एल. राहुल मैदानावर आला असता नेथन लायन त्याच्या जवळ जाऊन त्याला, "तू असं काय चुकीचं की तुला फलंदाजीसाठी खालच्या क्रमांकावर पाठवलं?" असा प्रश्न विचारला. यावर के. एल. राहुलने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
संजय मांजरेकरांनी साधला निशाणा
"त्याला (नेथन लायनला) चांगलं माहिती आहे की तो (के. एल. राहुल) चांगली फलंदाजी करतोय," असं भारतीय समालोचक संजय मांजरेकर यांनी कॉमेंट्री बॉक्समधून समोरचा प्रकार पाहिल्यानंतर म्हटलं. "तुम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगलं खेळता तेव्हा तुम्हाला फार सन्मान मिळतो. या मालिकेमध्ये भारताचा सर्वोत्तम फलंदाज असलेला के. एल. राहुलने सलामीवीर म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्यानंतरही त्याला हटवून रोहित शर्माला सलामीवर म्हणून संधी देण्यात आली. मला हा निर्णय चुकीचा वाटतो," असं मांजरेकर म्हणाले. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
भारताने फॉलोऑन टाळला
तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत भारताने 7 विकेट्सच्या मोबदल्यात 100 षटकांमध्ये 328 धावा केल्या आहेत. भारत हा ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा 146 धावा पिछाडीवर आहे. फलंदाजांनी निराशा केल्यानंतर भारताच्या शेपटाकडील फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर शरण जाण्यापेक्षा मैदानात टिकून राहिले. त्यामुळेच भारताला फॉलोऑन टाळता आला.