मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजला १४ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. ३ वनडे मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. याआधी मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आलेली असताना पहिल्या २ मॅच भारताने जिंकल्यानंतर उरलेल्या लागोपाठ ३ मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकून वनडे सीरिज खिशात टाकली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षीच्या या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न टीम इंडिया नक्कीच करेल, पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचं मात्र वेगळंच मत आहे. ऑस्ट्रेलिया ही सीरिज २-१ने जिंकेल, असा विश्वास पाँटिंगला आहे.


एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाँटिंग म्हणाला, 'वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये आत्मविश्वास आहे. टेस्ट क्रिकेटमध्येही ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम कामगिरी केली. मागच्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न भारतीय टीम नक्कीच करेल, पण ऑस्ट्रेलियाचा २-१ने विजय होईल, असं माझं भाकीत आहे.'



ऑस्ट्रेलियाप्रमाणेच वर्ल्ड कपनंतर भारताची कामगिरीही उल्लेखनीय झाली आहे. वर्ल्ड कपनंतर भारताने एकही टेस्ट मॅच गमावलेली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.


पाँटिंगने वनडे सीरिजमध्ये पहिल्यांदाच निवड झालेल्या मार्नस लॅबुशेनचंही कौतुक केलं आहे. लॅबुशेन वनडे क्रिकेटमध्येही मधल्या फळीत टेस्ट सारखीच कामगिरी करेल. लॅबुशेन स्पिनविरुद्ध चांगला खेळतो, तसंच तो रनही जलद धावतो. गरज पडली तर तो लेग स्पिन बॉलिंगही करु शकेल, असं पाँटिंग म्हणाला. 


लॅबुशेनने त्याच्या छोट्याश्या टेस्ट कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या ५ मॅचमध्ये मार्नस लॅबुशेनने ८९६ रन केले. या कामगिरीमुळे लॅबुशेनची ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीममध्येही निवड झाली आहे. लॅबुशेनने आतापर्यंत १४ टेस्ट खेळल्या आहेत.


भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ३ वनडे मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. १४ तारखेच्या मॅचनंतर राजकोटमध्ये १७ जानेवारीला दुसरी आणि १९ जानेवारीला बंगळुरूमध्ये तिसरी वनडे खेळवण्यात येणार आहे.