अरेरे! एकाच ठिकाणी पोहोचले 2 खेळाडू, नेमकं कोणाला द्यावं रनआऊट?
हा प्रकार पाहून अंपायरही गोंधळला...व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा नक्की कोण आऊट द्यावं?
मुंबई: बऱ्याचदा रनआऊटचा गोंधळ होतो. असाच घोळ आंतरराष्ट्रीय सामन्या दरम्यान झाला आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला टीम इंडियातील दोन खेळाडूंचा रनआऊट दरम्यान गोंधळ झाला. हा गोंधळ झाल्यानंतर अंपायरही गडबडला आणि नेमकं कोणाला आऊट द्यावं असा प्रश्न पडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय महिला क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल मैदानावर मालिकेच्या दुसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान एक विचित्र गोष्ट घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
ऑस्ट्रेलिया टीमची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम बॅटिंग करण्यास सांगितलं. महिला क्रिकेट टीमने 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 118 धावा केल्या. पूजा वस्त्रकर 26 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 37 धावांवर नाबाद राहिली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 28 धावांचे योगदान दिलं.
16 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर दीप्ती शर्माने स्वीप शॉट खेळला. त्यानंतर दीप्ती आणि तिची साथीदार दोघीही धावा काढण्यासाठी धावल्या. मात्र घोळ नेमका असा झाला की बॉल तोपर्यंत फील्डरकडून बॉलरजवळ पोहोचला होता. याच दरम्यान दोन्ही महिला क्रिकेटपटू एकाच ठिकाणी रन काढत पोहोचल्या. त्यामुळे नेमकी चूक कोणाची असा प्रश्न पडला. हा प्रकार पाहून अंपायरही काही सेकंद गोंधळला.