एडलेड : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या (१५ जानेवारी) एडलेड ओव्हल येथे होणार आहे. ही मॅच सकाळी ८.५० वाजता सुरु होणार आहे.
पहिल्या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्माच्या शतकी कामगिरीनंतर देखील भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात विजयी सुरुवात केल्याने या मालिकेत त्यांनी १-० आघाडी घेतली. त्यामुळे भारतासाठी उद्याचा सामना अटीतटीचा असणार आहे. तसेच मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे.


दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्याचा एडलेड  ओव्हलचा दुसरा एकदिवसीय सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. भारताचा पहिल्या सामान्यात पराभव झाल्याने मालिका जिंकण्यासाठी भारताला हा व पुढील सामना जिंकणे बंधनकारक असणार आहे.  तीन सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. त्यानंतर कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला. त्यामुळे दुसरा एकदिवसीय सामना जिंकून एकदिवसीय मालिका खिशात टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियाही प्रयत्नशील असेल.


यांच्या कामगिरीवर नजर


पहिल्या सामन्यात एकही धाव न करता आऊट झालेला शिखर धवन आणि अंबाती रायडू यांच्या खेळावर आता सर्वांचीच नजर असणार आहे. तसेच यांच्याऐवजी दुसऱ्या खेळांडूंना संधी सुद्धा दिली जाऊ शकते. अंतिम- ११ मध्ये बदल करण्याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप करण्यात आलेले नाही. 


पराभवाचे कारण


ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८९ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर धवन आणि अंबाती रायडूला भोपळा फोडता आला नाही. तसेच कोहलीला देखील या सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नाही. रोहित- धोनीमध्ये १३७ धावांची भागीदारी झाली. पण या भागीदारीला भारताला विजय मिळवून देता आला नाही. तसेच धोनीला चुकीच्या निर्णयाने बाद दिले गेले. भारताकडे रिव्हयू शिल्लक नसल्याने धोनीला मैदानाबाहेर जावे लागले. धोनीने रोहित शर्मा सोबत १३७ धावांची भागीदारी तर केली पण त्याला आपल्या खेळीला वेग देता आला नाही. धोनीच्या या संथ खेळीवर अजित आगरकरने प्रश्नचिन्ह निर्माण केले. धोनीने एकून ९६ बॉलमध्ये ५१ धावा केल्या.


हार्दिक पांड्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने मधल्या फळीत धमाकेदार खेळ करणारा खेळाडू भारताकडे नाही. तसेच धोनीने फलंदाजीसाठी चौथ्या की पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे, हे निश्चित नाही. सध्या चौथ्या क्रमांकावर अंबाती रायडू खेळत आहे. धोनीने चौथ्या क्रमांकावर खेळायला हवे अशी रोहितची इच्छा आहे.