मुंबई : टीम इंडियाने (Team India) २०१९ मध्ये क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले असतानाच आता बांग्लादेश विरुध (India vs Bangladesh) मोठा विजय मिळवला आहे. भारतीय संघानेही बांग्लादेशविरुद्ध पहिल्या विजयासह चांगली सुरुवात केली. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांग्लादेशचा एक डाव आणि १३० धावांनी पराभव केला. टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून कोलकाता (Kolkata Test) येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघांची ही पहिली दिवस-रात्र कसोटी सामना असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि बांग्लादेश यांच्यात इंदूर (Indore Test) येथे पहिली कसोटी खेळली गेली. यजमान भारतीय संघाने (India) प्रथम गोलंदाजी करीत बांग्लादेश संघाला १५० धावांवर रोखले. त्यानंतर मयंक अग्रवालच्या  (Mayank Agarwal) द्विशतकाच्या जोरावर मदतीने भारताने ४९३/६ अशी मोठी धावसंख्या उभारली. भारताला ३४३ धावांची मोठी आघाडी मिळाली. डावातील पराभव टाळण्यासाठी बांग्लादेशला किमान ३४३ धावांची गरज होती. पण पाहुण्या संघाचा पहिल्या डावाप्रमाणे दुसर्‍या डावातही कोलमडला. बांग्लादेशचा दुसरा डाव २१३ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.


पाहुण्या बांग्लादेश संघाने भारताच्या वेगवान गोलंदाजांचीसमोर पहिल्याच दिवशी मान टाकली. अवघ्या १५० धावांतच बांग्लादेशचा संघ गारद झाला. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांनी बांग्लादेशचे सात फलंदाज माघारी पाठवले. त्यांना साथ मिळाली ती आर. अश्विनची. त्याने दोन बळी मिळविले. पहिल्या डावात मुशफिकुर रहीमने सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने पहिला डाव ६ बाद ४९३ धावांवर घोषित केला.


सलामीवीर मयांक अग्रवालने २४३ धावांची खेळी केली. रोहित शर्मा अवघ्या सहा धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजाराने ५४ धावा करून चांगली साथ दिली. कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. अजिंक्य रहाणेने ८६ धावा केल्या. तर अष्टपैलू रवींद्र जडेजाने ६० धावांची चांगली खेळी केली. उमेश यादवने २५ धावा केल्या. बांग्लादेशकडून अबु झायेदने ४ बळी घेतले.



भारताने लक्ष्याचे पाठलाग करताना बांग्लादेशच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही अडखळत झाली. ७२ धावांवरच बांग्लादेशचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मात्र, मुशफिकुर रहीमने दुसऱ्या डावातही ६४ धावा करून कसोटी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला आर. अश्विनने बाद केले. भारताच्या भेदक माऱ्यासमोर बांग्लादेशची अंतिम फळी मैदानावर फार काळ तग धरू शकली नाही. त्यांचा डाव २१३ धावांवर आटोपला.  भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर अश्विनने दोन आणि उमेश यादवे दोन विकेट घेतल्या.