IND vs BAN T20 WC: भारताकडून पराभवानंतर बांग्लादेशी खेळाडू आणि चाहत्यांना अश्रृ अनावर
T20 world cup 2022 : भारताविरुद्ध ५ धावांनी पराभव झाल्यानंतर बांग्लादेशचे खेळाडू आणि चाहते निराश झाले.
IND vs BAN : बांगलादेशला टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताविरुद्ध 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ आपल्या गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे भारताचं सेमिफायनलची तिकीट निश्चित झालं आहे. भारताकडून झालेल्या पराभवानंतर बांगलादेशी चाहते आणि क्रिकेटपटू गहीवरले. त्यांना अश्रृ अनावर झाले.
T20 विश्वचषकाच्या अत्यंत रोमांचक सामन्यात बांगलादेशला भारताविरुद्ध 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यात बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. पण त्यांना सहा गड्यांच्या मोबदल्यात 145 धावाच करता आल्या.
बांगलादेशविरुद्ध मिळालेल्या विजयामुळे भारताचा सेमिफायनलचा मार्ग खुला झाला आहे. आज जर भारताचा पराभव झाला असता तर भारतीय संघाला सेमिफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दुसऱ्या संघावर अवलंबून राहावं लागलं असतं. 6 नोव्हेंबरला भारताचा सामना आता झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा विजय भारताला आठ गुणांवर नेईल. ज्यामुळे भारत सेमिफायनलमध्ये जाईल. भारत कमकुवत झिम्बाब्वेकडून हरला तर बांगलादेश किंवा पाकिस्तानसोबत नेट-रन रेटची समस्या निर्माण होऊ शकते.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये बांगलादेशी चाहते रडताना दिसत आहेत. वेगवान गोलंदाज तस्किन अहमद या पराभवामुळे खूप निराश झाला होता. भारताकडून पराभवानंतर कर्णधार शकिब अल हसननेही निराशा व्यक्त केली. शाकिब म्हणाला, 'आम्ही भारताविरुद्ध खेळतो तेव्हा आम्ही सामना जिंकण्याच्या जवळ असतो, पण आम्ही विजयी होत नाही. हा एक चांगला खेळ होता ज्याचा दोन्ही संघांनी आनंद घेतला आणि आम्हाला तेच हवे होते. शेवटी कोणाला जिंकावे लागते तर कोणाला हारावे लागते.'
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 6 गडी गमावून 184 धावा केल्या. केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आणि त्याने 32 चेंडूत 50 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादवने 16 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 30 धावांची खेळी केली. विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 64 धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने 16 षटकांत 6 बाद 145 धावा केल्या. लिटन दासने आपल्या झंझावाती खेळीच्या जोरावर एके काळी भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं होतं. लिटन दासने 27 चेंडूत 60 धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. नुरुल हसनने नाबाद 25 आणि नजमुल हुसेन शांतोने 21 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन विकेट घेतले.