India vs England: भारतीय संघात स्थान मिळालेल्या सरफराज खानने (Sarfaraz Khan) पहिल्याच सामन्यात आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुर्देवाने सरफराज खान पहिल्या सामन्यात 62 धावांवर बाद झाला असला तरी, त्याने आपल्या खेळीने भविष्यातील मोठ्या कामगिरीचे संकेत दिले आहेत. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघासमोर खेळताना सरफराज अजिबात डगडमगला नाही. एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने फक्त 66 चेंडूत 62 धावा कुटल्या आणि आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरफराजने फक्त 48 चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि भारताला 300 ची धावसंख्या पार करण्यात मदत केली. सरफराज जबरदस्त खेळी करत असताना त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान मैदानातच उपस्थित होते. आपल्या मुलाला अनिल कुंबलेने कॅप दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. सरफराजनेही मैदानात सहकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर वडिलांच्या दिशेने धावत घेत मिठी मारत आपला आनंद व्यक्त केला होता. 


दरम्यान सरफराजने पत्रकार परिषदेत खुलासा केला की त्याचे वडील हा सामना पाहण्यास येणार नव्हते. त्याचं हे विधान ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. नौशाद खान यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत सरफराजच्या या विधानावर स्पष्टीकरण देत आपण आजारी असल्याने हा सामना पाहायला यायचं नाही असं जवळपास ठरवलं होतं अशी माहिती दिली, 


"जगात असे कोणतेही आई-वडील नाहीत जे मुलांना सर्व काही देत नाहीत. त्याच्या नशिबाने त्याला वडील आणि कोच एकाच व्यक्तीत मिळाले," अशी भावना नौशाद खान यांनी व्यक्त केली. नौशाद खान यांनी यावेळी सुर्यकुमार यादवने जबरदस्ती केल्यानेच आपण सामन्याच्या एक दिवस आधी राजकोटला गेल्याची माहिती दिली. 


"सूर्यकुमार यादवने मला राजकोटमधील सामन्यात जाण्यास सांगितलं. सकाळी 11 वाजेपर्यंत माझी राजकोटला जाण्याची कोणतीही योजना नव्हती. मी थोडा आजारी होतो. माझ्या आवाजावरुनही तुम्हाला हे समजेल. मी तिथे गेल्यास सरफराजवर दबाव वाढेल असं मी सुर्यकुमारला सांगितल. त्याला संधी मिळेल की नाही याबाबत मला शाश्वती नव्हती. सूर्यकुमार यादवने मला तुम्हाला आयुष्यात पुन्हा अशी संधी मिळणार नाही हे समजावून सांगितलं. मीदेखील माझ्या आई-वडिलांनी कसोटी सामन्यात घेऊन गेल्याची आठवण त्याने सांगितली. आम्हाला एकच तिकीट मिळालं आणि राजकोटला आलो," अशी माहिती नौशाद खान यांनी दिली.


सरफराजला मैदानात खेळताना पाहण्यासाठी त्याचे वडील आणि पत्नी उपस्थित होते. बीसीसीआयने त्यांचा मैदानातील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये नौशाद खान कर्णधार रोहित शर्माकडे आपल्या मुलाला सांभाळून घेण्यास सांगताना दिसत आहेत. रोहितही त्यांनी काळजी करु नका असं सांगत धीर देतो.