Mr 360° सूर्यालाही जमलं नाही ते रिंकूने पहिल्याच सामन्यात करुन दाखवलं; केवळ दुसरा खेळाडू ज्याने...
Rinku Singh Jumps To Number 2: रिंकू सिंहने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये फलंदाजी केली. आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने उत्तम कामगिरी करत एका अनोख्या यादीमध्ये थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रिंकूला पहिल्याच सामन्यामध्ये `प्लेअर ऑफ द मॅच` पुरस्कारही मिळाला.
Rinku Singh Jumps To Number 2: कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये 2-0 ने विजयी आघाडी मिळवली आहे. भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना 33 धावांनी जिंकला. पहिल्या सामन्यामध्ये पावसामुळे भारताला डकवर्थ लुइस नियमानुसार 2 धावांनी विजय मिळाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 185 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 58, संजू सॅमसनने 40 आणि रिंकू सिंहने 38 धावा केल्या. रिंकू सिंहने 2023 मध्ये टी-20 सामन्यांत डेथ ओव्हर्समध्ये 23 षटकार लगावले आहेत. रिंकू इतके षटकार कोणत्याही भारतीय फलंदाजाने डेथ ओव्हर्समध्ये लगावलेले नाहीत. भारताने दिलेल्या 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 20 ओव्हरमध्ये केवळ 152 धावांपर्यंत मजल मारु शकला. मालिकेतील अंतिम सामना 23 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.
'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार पटकावला
25 वर्षीय रिंकू सिंहने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात फलंदाजी केली. त्याने प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारही जिंकला. 21 चेंडूंमध्ये त्याने 38 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 181 इतका होता. त्याने या खेळीमध्ये 2 चौकार आणि 3 षयकार लगावले. मला माझ्या फलंदाजीवर विश्वास होता. मी आयपीएलमधील अनुभव येथे वापरण्याचा प्रयत्न केला. मी शेवटपर्यंत टिकून राहण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाल्याने मला फार आनंद झाला आहे, असं सामना संपल्यानंतर रिंकू सिंहने सांगितलं. सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर कर्णधार बुमराहनेसुद्धा रिंकूला मिठी मारली.
षटकारांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी
सन 2023 मध्ये रिंकूने टी-20 मध्ये 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. रिंकून या वर्षी 13 डावांमध्ये 133 चेंडूंवर 266 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 38 इतकी आहे. या खेळींदरम्याने त्याने 23 षटकार आणि 16 चौकार लगावले. म्हणजेच त्याने चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले. अगदी सूर्यकुमार यादवलाही अशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या वर्षी डेथ ओव्हरमध्ये रिंकूपेक्षा अधिक षटकार लगावणाऱ्यांमध्ये केवळ एक खेळाडू त्याच्या पुढे आहे. हा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड मिलर. डेव्हिड मिलरने 22 डावांमध्ये 28 षटकार लगावले आहेत.
केवळ सूर्यकुमार त्याच्या पुढे
टी-20 मध्ये मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या रिंकू सिंहने दमदार सुरुवात केली असून त्याने पहिल्याच सामन्यात 181 च्या स्ट्राइक रेटने धावा जमवल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील विक्रम पाहता पहिल्याच सामन्यामध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर रिंकूने भारताचा मिस्टर 360 डिग्री म्हणून ओखळल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या तोडीची कामगिरी केली आहे. टी-20 मध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असलेल्या सूर्यकुमारने आपल्या पहिल्या अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 184 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. तिलक वर्माने 177 तर ईशान किशनने 175 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या.