रोहित शर्मानंतर ऋषभ पंतचं बॅड लक! एका धावाने हुकलं शतक... पण टीम इंडियासाठी लढला
IND VS NZ 1st Test Rishabh Pant : सरफराज खानने 150 धावा केल्या तर ऋषभ पंतचं शतक मात्र केवळ एका धावाने हुकले.
IND VS NZ 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून बंगळुरूमध्ये या सीरिजचा पहिला सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी सरफराज खान आणि ऋषभ पंतने न्यूझीलंडने उभी केलेली धावांची मोठी आघाडी मोडली. या दरम्यान सरफराज खानने 150 धावा केल्या तर ऋषभ पंतचं शतक मात्र केवळ एका धावाने हुकले.
कसं हुकलं ऋषभ पंतचं शतक?
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विकेटकिपिंग करताना ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिसऱ्या दिवशी तो मैदानाबाहेरच राहिला. तिसऱ्या दिवसाअंती टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेटवर 231 धावा अशी होती. तर न्यूझीलंडने 125 धावांच्या आघाडीवर होते. चौथ्या दिवशी ऋषभ पंत मैदानात आला आणि त्याने सरफराज खान सोबत मैदानात टिकून फलंदाजी केली. यादरम्यान सरफराजन 150 धावा करून बाद झाला. तर ऋषभ पंतने सुद्धा 9 चौकार आणि 5 षटकारांसह 105 बॉलमध्ये 99 धावा केल्या होत्या. दुखापतीतून सावरलेला ऋषभ पंत शतकाच्या इतक्या जवळ असल्याने सर्वजण त्याचा जल्लोष करण्यासाठी सज्ज होते.
89 वी ओव्हर टाकण्यासाठी न्यूझीलंडचा गोलंदाज विल्यम ओरुरके आला. यावेळी त्याने टाकलेल्या पहिल्याच बॉलवर ऋषभ पंत बोल्ड आउट झाला. फक्त एका धावाने ऋषभ पंतचं शतक हुकल्यामुळे मैदानात एकच शांतता पसरली. नॉन स्ट्राईकवर असलेला केएल राहुल तर ऋषभ बोल्ड झाल्यावर खालीच बसला. तर ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या फलंदाजांना सुद्धा धक्का बसला. ऋषभ पंतच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. ऋषभ पंतची विकेट पडली तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर 5 बाद 433 असा होता.
भारताची प्लेईंग 11 :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंडची प्लेईंग 11 :
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके