न्यूझीलंडच्या फलंदाजाचा पराक्रम, विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करत विश्व विक्रमाला गवसणी
विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकत न्यूझीलंडचा हा फलंदाज टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
रांची | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रांचीत दुसरा टी 20 सामना (india vs new zealand 2nd Match) खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टीलने (Martin Guptill) विराट कोहलीचा (Virat Kohli) वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यासह गुप्टील टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. गुप्टीलने 11 वी धाव घेताच हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. गुप्टीलने 107 डावांमध्ये हा रेकॉर्ड केला. (Ind vs nz 2nd t 20i Martin Guptill makes world record overtake to virat kohli and become highest run scorer in T20 cricket)
सामन्याआधी गुप्टीलला हा रेकॉर्ड करण्यासाठी 11 धावांची आवश्यकता होती. गुप्टीलने भुवनेश्वर कुमारच्या स्पेलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार ठोकत हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.
गुप्टीलने या सामन्यात एकूण 15 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 31 धावांची आक्रमक खेळी केली. ताज्या आकडेवारीनुसार आता गुप्टीलच्या नावे 111 टी सामन्यात 3 हजार 248 धावांची नोंद आहे. या दरम्यान गुप्टीलने 2 शतकं आणि 19 अर्धशतकं लगावली आहेत.
दुसऱ्या स्थानी विराट कोहलीने आतापर्यंत 95 सामन्यांमधील 87 डावात 52.04 च्या सरासरीने 3 हजार 227 धावा केल्या आहेत. यामध्ये विराटने 29 अर्धशतक झळकावले आहेत. तर 94 ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या टी 20 मालिकेतून विराटने विश्रांती घेतली आहे.
तिसऱ्या स्थानी टीम इंडियाचा नवनिर्वाचित टी 20 कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने 117 मॅचेसमध्ये 32.82 एव्हरेजने 3 हजार 86 धावा चोपल्या आहेत. रोहितने यामध्ये 4 शतक आणि 24 अर्धशतक लगावलेत.
टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात धमाका
गुप्टीलने या टी 20 मालिकेतील जयपूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात 42 चेंडूत 4 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने 70 धावा कुटल्या होत्या. मार्टिनचं टीम इंडिया विरुद्धचं हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं.
टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
मार्टिन गुप्टील - 3 हजार 248 धावा.
विराट कोहली - 3 हजार 227 धावा.
रोहित शर्मा - 3 हजार 86 धावा.
एरॉन फिंच - 2 हजार 608 धावा.
पॉल स्टर्लिंग - 2 हजार 570 धावा.
टीम इंडियाचे शिलेदार | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि हर्षल पटेल.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टीम साऊथी (कॅप्टन), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, एम चॅम्पमॅन, ग्लेन फिलीप्स, टीम सायफर्ट (विकेटकीपर), जेम्स निशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, इश सोढी आणि ट्रेन्ट बोल्ट.