मुंबई : भारतीय संघाविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने रचिन रवींद्रला (Rachin Ravindra) मैदानात उतरवले. बुधवारी जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात तो फार काही (7 धावा) करू शकला नाही, मात्र त्याच्या नावाची चर्चा आहे. वेलिंग्टनमध्ये जन्मलेला 22 वर्षीय क्रिकेटर रचिन रवींद्रचे भारतीय कनेक्शन खूपच मनोरंजक आहे. भारताच्या दिग्गज खेळाडूंशी रचिनचे नावाचे नाते आहे. भारतीय वंशाचा लेग-स्पिनर ईश सोधीने सध्याच्या न्यूझीलंड क्रिकेटमध्ये आधीच आपले स्थान निर्माण केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक, किवी फलंदाज रवींद्रचे वडील आर. कृष्णमूर्ती त्यांच्या कामानिमित्त ९० च्या दशकात न्यूझीलंडला गेले होते. तेथेच रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याचा जन्म झाला. रचिनच्या वडिलांना क्रिकेटमध्ये खूप रस होता आणि त्यांनी वेलिंग्टनमध्ये स्वतःचा क्रिकेट क्लबही सुरू केला होता. सचिन तेंडुलकर (Sachine Tendulkar) आणि राहुल द्रविडचे (Rahul Dravid) चाहते असलेल्या रचिनच्या वडिलांनी या भारतीय दिग्गजांच्या नावांची अक्षरे मिसळून आपल्या मुलाचे नाव 'रचिन' ठेवले. (रचिन: रा-राहुल, चिन-सचिन)


न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रचिन हा आगामी काळातील स्टार मानला जातो. 2016 आणि 2018 मध्ये न्यूझीलंडसाठी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतही रचिनने भाग घेतला आणि चमकदार कामगिरी केली. याशिवाय नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड संघात रचिन कायम आहे. रचिनने सप्टेंबर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.


त्या मालिकेत रचिन फलंदाजीमध्ये काही आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नसला तरी, रचिनने आतापर्यंत 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 6 विकेट घेत न्यूझीलंड संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून आपले स्थान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रचिनने गेल्या दोन मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, रचिनने 28 सामन्यांमध्ये 38.90 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.


न्यूझीलंड संघाला या मालिकेत फिरकी अष्टपैलू म्हणून रचिनकडून खूप आशा आहेत, भारतीय खेळपट्ट्यांवर त्याचा खेळ खूप प्रभावी ठरू शकतो. जयपूर येथे झालेल्या पहिल्या T20 मध्ये जिमी नीशमच्या जागी रचिनला मैदानात उतरवण्यात आले होते पण तो फलंदाजीत काही विशेष करू शकला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पुढचा टी-20 सामना रांचीमध्ये 19 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंडला पुनरागमनाची आशा असेल.