फक्त रोहितच नाही, तर या खेळाडूने फिरवली मॅच
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा रोमांचक विजय झाला.
हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा रोमांचक विजय झाला. सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या मॅचमध्ये भारताला शेवटच्या २ बॉलमध्ये १० रनची गरज होती. अखेर रोहित शर्माने या दोन्ही बॉलवर सिक्स मारून भारताला जिंकवून दिलं. याचसोबत भारताने ५ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये ३-०नी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडमध्ये टी-२० सीरिज जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.
भारताच्या या रोमहर्षक विजयाचा शिल्पकार रोहित शर्मा असला तरी मोहम्मद शमीने टाकलेली २०वी ओव्हरही तितकीच महत्त्वाची ठरली. शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी ९ रनची गरज होती. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन ९५ रनवर आणि रॉस टेलर ७ बॉलमध्ये १० रनवर खेळत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलला रॉस टेलरने सिक्स मारला.
रॉस टेलरच्या सिक्ससोबतच मॅच भारताच्या हातातून गेल्याचं वाटत होतं, कारण आता न्यूझीलंडला विजयासाठी फक्त ३ रनची गरज होती. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला रॉस टेलरने एक रन काढून केन विलियमसनला स्ट्राईक दिला. ९५ रनवर खेळत असलेला केन विलियमसन त्याच्या शतकापासून फक्त एक सिक्स दूर होता. ज्या पद्धतीने केन विलियमसनने या मॅचमध्ये भारतीय बॉलरचा समाचार घेतला त्यावरुन तो सिक्स मारून न्यूझीलंडला जिंकवेल आणि त्याचं शतक पूर्ण करेल, असंच वाटत होतं.
ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला मोहम्मद शमीने टाकलेला बाऊन्सर विलियमसनने थर्ड मॅनला मारण्याचा प्रयत्न केला. पण विलियमसनच्या बॅटला बॉल लागून तो थेट विकेट कीपर केएल राहुलच्या हातात गेला.
विलियमसन आऊट झाल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी ३ बॉलमध्ये २ रनची गरज होती. मैदानात नव्याने आलेल्या टीम सायफर्टला ओव्हरच्या चौथ्या बॉलवर एकही रन काढता आली नाही. शमीचा पाचवा बॉलही सायफर्टच्या बॅटला न लागता विकेट कीपर राहुलच्या हातात गेला. तरीही सायफर्टने एक रन काढून टेलरला स्ट्राईक दिला. आता न्यूझीलंडला शेवटच्या बॉलवर विजयासाठी १ रनची गरज होती, पण शमीने यॉर्कर टाकून टेलरला बोल्ड केलं आणि मॅच टाय झाली. अखेर या मॅचचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये लागला.