India vs New zealand 2023: भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या (Ind vs NZ ODI) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 12 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यामध्ये इशान किशानने (Ishan Kishan) केलेल्या एका कृतीमुळे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) प्रचंड संतापले. भारताने दिलेल्या 350 धावांच्या लक्ष्याचं पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत असताना इशानने 16 व्या षटकामध्ये केलेल्या कृतीवरुन गावस्करांनी संताप व्यक्त केला आहे. कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) टाकलेल्या 16 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फलंदाज टॉम लॅथमने (Tom Latham) बचाव केला. लॅथमने चेंडू लेग साईडला खेळून काढला. एकीकडे चेंडू फिल्डरकडे जात असतानाच बॅकफूटवर जाऊन चेंडू डिफेन्ड करत असतानाच स्टम्पवरील बेल्स पडल्या. यानंतर रोहित शर्मापासून (Rohit Sharma) कुलदीप यादवनेही हिट विकेटसाठी अपिल केलं. मात्र नंतर जे सत्य समोर आलं ते फारच धक्कादायक होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थर्ड अंम्पायरला व्हिडीओ रिप्लेमध्ये असं दिसून आलं की लॅथमचा पाय स्टम्पला लागला नव्हता. तर इशाननेच जाणूनबुजून स्टम्पवरील बेल्स उडवले होते. मस्करी म्हणून इशानने ही कृती केली होती. मोठ्या स्क्रीनवर थर्ड अंम्पायरसाठी रिप्ले दाखवला गेला तेव्हा इशान हसताना दिसला. इशानच्या या कृतीवर न्यूझीलंडच्या फलंदांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इतकंच काय तर हा रिप्ले पाहून भारतीय खेळाडूही कोणत्याही प्रकारे यावर व्यक्त झाले नाहीत.



कुलदीपने आपली ओव्हर पूर्ण केली. शेवटच्या चेंडूवर लॅथम एक धाव धावला आणि पुन्हा पुढच्या ओव्हरला फलंदाजीला आला. विशेष म्हणजे लॅथमने भारताच्या फलंदाजीच्या वेळी हार्दिक पंड्याला स्टम्पिंग करत बाद केलं होतं. मात्र हा निर्णय वादग्रस्त ठरला होता. त्यामुळेच इशानने मस्करीत ही कृती केल्याची चर्चा आहे.


पण मैदानावर हा सारा प्रकार सुरु असताना कॉमेन्ट्री बॉक्समधून कॉमेन्ट्री करणाऱ्या सुनिल गावस्करांना इशानने केलेला हा प्रकार फारच चुकीचा वाटला. इशानने जे काही केलं त्याला क्रिकेट असं म्हणता येणार नाही, असं म्हणत गावस्करांनी आपली नाराजी व्यक्त केली. तर गावस्करांबरोबर कॉमेन्ट्री करणाऱ्या मुरली कार्तिकनेही जर इशानने हे मस्करीसाठी केलं होतं तर त्याने अपिल करायला नको होती, असं म्हटलं.


दरम्यान, याच सामन्यामध्ये शुभमन गिलनं 208 धावांची खेळी करत इशान किशनचा सर्वात कमी वयामध्ये द्विशतक झळकावण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केला.