IND vs NZ : खराब फॉर्मचा विराटच्या अव्वल स्थानाला धक्का
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाला.
दुबई : न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाला. या दौऱ्यामध्ये कर्णधार विराट कोहली खराब फॉर्ममध्ये आहे. याचा फटका कोहलीच्या क्रमवारीलाही बसला आहे. आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हा बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये विराट २ रनवर तर दुसऱ्या इनिंगमध्ये १९ रनवर आऊट झाला. विराटच्या खात्यात आता ९०६ पॉईंट्स आहेत. स्टीव्ह स्मिथ विराटपेक्षा ५ पॉईंट्सने पुढे आहे. विराटशिवाय रहाणे, पुजारा आणि मयंक अग्रवाल टॉप-१०मध्ये आहे. अजिंक्य रहाणे ७६० पॉईंट्ससह आठव्या, चेतेश्वर पुजारा ७५७ पॉईंट्ससह नवव्या आणि मयंक अग्रवाल ७२७ पॉईंट्ससह १०व्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने मार्नल लॅबुशेनला मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला आहे. केन विलियमसनने पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ८९ रनची खेळी केली होती.
बॉलरच्या यादीमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचे पॉईंट्स कमी झाले आहेत, त्यामुळे टॉप-१०मधून बाहेर झाले आहेत. आर.अश्विन हा एकमेव भारतीय बॉलर टॉप-१०मध्ये आहे. अश्विन ७६५ पॉईंट्ससह नवव्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदीने पहिल्या टेस्टमध्ये एकूण ९ विकेट घेतल्यामुळे तो ८ स्थानं वरती आला आहे. टीम क्रमवारीमध्ये भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर कायम आहे.