माऊंट मांगनुई : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५ विकेटने पराभव झाला. याचबरोबर भारताने ही सीरिज ३-०ने गमावली. विराट कोहलीचा फॉर्म हा भारताच्या या सीरिजमधल्या पराभवाचं प्रमुख कारण ठरला. मागच्या ५ वर्षातली विराट कोहलीची ही सगळ्यात खराब कामगिरी ठरली. विराट कोहलीने या सीरिजच्या ३ इनिंगमध्ये फक्त ७५ रन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये विराटला ५१ रन, दुसऱ्या मॅचमध्ये १५ रन आणि तिसऱ्या मॅचमध्ये ९ रन करता आले. विराट कोहलीने या सीरिजमध्ये २५ च्या सरासरीने रन केले. मागच्या ५ वर्षातली विराटची ही सगळ्यात कमी सरासरी आहे. याआधी २०१५ साली बांगलादेशविरुद्ध विराटची सरासरी कमी होती.


पहिल्या मॅचमध्ये विराटने अर्धशतक केलं असलं तरी श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यामुळे भारताने ३५० रनचा टप्पा गाठला होता. दुसऱ्या वनडेमध्ये कोहली अपयशी ठरला आणि भारताचा २२ रननी पराभव झाला. २०१४ नंतर भारताला पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरिज गमवावी लागली.


विराटबरोबरच जसप्रीत बुमराहचा फॉर्मही भारताच्या पराभवाचं एक कारण ठरलं.  जसप्रीत बुमराहला या सीरिजमध्ये एकही विकेट मिळाली नाही. वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून पहिल्यांदाच बुमराह एखाद्या सीरिजमध्ये एकही विकेट घेऊ शकला नाही.


३१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताला वनडे सीरिजमध्ये व्हाईट वॉशचा सामना करावा लागला आहे. याआधी १९८८-८९ साली वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने वनडे सीरिज ५-०ने गमावली होती. त्याआधी १९८३-८४ सालीही वेस्ट इंडिजविरुद्धच भारताला ५-०ने पराभव पत्करावा लागला होता.


२००६-०७ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा ४-०ने पराभव झाला होता. या सीरिजमधली एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती. विराटच्या नेतृत्वात पहिल्यांदाच भारताला वनडे सीरिजची एकही मॅच जिंकता आली नाही. याआधी २०१४ साली धोनी कर्णधार असताना न्यूझीलंडविरुद्धच भारताला एकही वनडे जिंकता आली नव्हती. ५ मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा ४-०ने पराभव झाला, तर एक मॅच टाय झाली.