क्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा ७ विकेटने पराभव झाला आहे. याचसोबत भारताने ही टेस्ट सीरिज २-०ने गमावली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने या पराभवाचं कारण सांगितलं आहे. आम्ही चुकांमधून सुधारलो नाही, असं विराट म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय बॅट्समननी टेस्ट क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा १६५ आणि १९१ रनवर ऑलआऊट झाला. यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताला २४२ रन आणि १२४ रनच करता आले.


'आम्हाला पराभवाची कारणं द्यायची नाहीत, पण आम्ही शिकत आहोत. चुकांमधून सुधारायचा प्रयत्न करु. टी-२० सीरिज चांगली झाली. वनडेमध्ये आमच्या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या काही सकारात्मक गोष्टी आहेत. पण टेस्टमध्ये आम्ही एक टीम म्हणून चांगले खेळलो नाही,' असं विराटने सांगितलं.


'आम्ही चांगले खेळलो नाही, हे स्वीकारायची गरज आहे. आम्हाला या गोष्टी गांभीर्याने घ्याव्या लागतील. आमचे बॅट्समन न्यूझीलंडच्या बॉलरसमोर दबावात दिसले. न्यूझीलंडच्या बॉलरनी भारतीय बॅट्समनना चूक करायला भाग पाडलं,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.


'आमचे बॅट्समन नेहमी लढतात, पण इकडे त्यांनी खास कामगिरी केली नाही. त्यामुळे बॉलरना आक्रमणाची संधी मिळाली नाही. बॅट्समनी बॉलरना साथ न देणं निराशाजनक आहे. घराबाहेर सीरिज आणि मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी करावी लागते,' असं मत विराटने व्यक्त केलं.