IND vs SA : 8 वर्षात संजू सॅमसनने पहिल्यांदा केली अशी कामगिरी, टीकाकारांना दिलं चोख उत्तर
IND vs SA 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विकेटकिपर आणि फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं पहिलं शतकं ठोकलं. गेल्या आठ वर्षात संजूने पहिल्यांदा शतकी खेळी केली आहे.
IND vs SA 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SA) टीम इंडियाने 296 धावांचा डोंगर उभा केला. यात सर्वात मोठा वाटा होता तो टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज संजू सॅमसनचा (Sanju Samson). संजू सॅमसनने आपल्या 8 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदा शतकी खेळी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनने 110 चेंडूत शतक पूर्ण केलं. यात 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला संजू खेळपट्टीवर भक्कमपणे उभा राहिला आणि भारतीय क्रिकेट संघाचा डाव सावरला. या खेळीच्या जोरावर संजूने आपल्या टीकाकारांनाही चोख उत्तर दिलं आहे.
क्रिकेट कारकिर्दीतलं पहिलं शतक
संजू सॅमसमने 44 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत शतक पूर्ण केलं. पहिला शतकाचं त्याने जोरदार सेलेब्रेशनही केलं. संजूने कर्णधार केएल राहुलबरोबर (21 धावा) तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची आणि तिलक वर्माबरोबर (52 धावा) चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागिदारी केली. तिलक वर्माने 77 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या.
108 धावांवर बाद
शतक केल्यानंतर संजू सॅमसम मैदानावर फार काळ टिकला नाही. फटकेबाजीच्या नादात संजू 108 धावांवर बाद झाला. लिजाज विलियम्सने त्याची विकेट घेतली. संजूने 114 चेंडूंचा सामना केला. यात त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. आयपीएलमध्ये (IPL) संजू सॅमसन राजस्थान रॉयलचं कर्णधारपद सांभाळतो.
2015 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण
केरळाच्या संजू सॅमसमने 2015 मध्ये टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण एकदिवसीय पदार्पण करण्यासाठी त्याला तब्बल 6 वर्ष वाट पाहावी लागली. 2021 मध्ये त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. गेल्या आठ वर्षात संजूला टीम इंडियात फार संधी मिळाली नाही. गेल्या 8 वर्षात 24 टी20 सामने खेळला आहे. तर गेल्या तीन वर्षात त्याच्या वाटेला केवळ 15 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आलेत. संजूने सोळाव्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावलंय.
टीम इंडिया 296 धावा
पार्ल एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत भारताला पहिली फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. रजत पाटीदारने या सामन्यातू एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण तो 22 धावा करुन बाद झाला. युवा फलंदाज साई सुदर्शननही 10 धावांवर बाद झाला. तर रिंकू शर्माने आक्रमक फलंदाजी करत 38 धावा केल्या.