क्रिकेट समीक्षक, रवि पत्की, झी 24 तास मुंबई : दक्षिण अफ्रिकेतील जंगलांमध्ये आढळणारे हत्ती,गवा, सिंह,बिबट्या आणि गेंडा ह्यांना 'बिग फाईव्ह' असे म्हणतात. हे पाच प्राणी शिकार करायला अत्यंत अवघड. त्यांच्या अधिवासात जाऊन त्यांची शिकार करणे जवळजवळ अशक्यच. त्याच धरतीवर अफ्रिकेचा क्रिकेट संघ बिग इलेव्हन ठरला आणि त्यांच्या देशात भारताविरुद्ध त्यांनी स्वतःची शिकार होऊ दिली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघात आमला, डिव्हिलर्स, डीकॉक,डुपलसी, मॉर्कल हे बिग फाईव्ह नसताना अकरा जणांनी स्वतः ला बिग इलेव्हन बनवले. अफ्रिकन प्रोटीआच्या फुलांसारखी  गुणांच्या रंगांची मुक्त उधळण करत मालिका जिंकली.


अफ्रिकेला जाताना भारतीय संघाकडे संभाव्य जेते म्हणून पाहिले जात होते.त्याला कारणे तशीच होती.अफ्रिकेचा अननुभवी संघ,तेथील पीचेसचा अनुभव असलेले भारताचे प्रमुख बॅट्समन आणि नजीकच्या काळात सिद्ध झालेली भारताची सक्षम गोलनदाजी. 


भारतीय बॉलर्स नी चांगली गोलनदाजी केली पण अफ्रिकन बॉलर्सनी जास्त दबाव निर्माण करणारी बॉलिंग करून विकेट्स मिळवल्या.अफ्रिकेच्या रबाडा, एनगीडी आणि यैनसन यांच्या उंची,बळ आणि अचुकतेपुढे भारतीय गोलनदाज कमी पडले.तसेच आफ्रिकन बॅट्समनला घरच्या सिमिंग कण्डीशन्सवर खेळणे अवघड गेले नाही.


आफ्रिकन बॅट्समन पेक्षा भारतीय बॅट्समनना त्या कंडिशन्स अधिक अवघड होत्या.भारताच्या मालिकेतील विकेट्स पाहिल्या तर फारसे कुणी रॅश शॉट मारून आऊट झालेले दिसत नाही.मग भारतीय बॅट्समन कुठे कमी पडले? अचूक टप्प्या वरचे चेंडू सोडण्यात आणि धैर्याने चेंडू अंगावर घेण्यात.दोन्ही गोष्टी बोलायला सोप्या आहेत प्रत्यक्ष करायला अवघड. त्यात कोहली अनेकदा रॅश शॉट खेळून आऊट झाला हे खरेच.


संघ निवडीत पुजारा आणि रहाणे यांच्यावर लोकांचा विशेष राग दितोय.त्या पीचेसवर ह्या दोघांना सर्वाधिक अनुभव होता.त्यांच्या ऐवजी श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी घेतले असते तर त्या पीचेसवर त्यांनी फारसे वेगळे केले असते असे वाटत नाही. 


पुजाराची मागील 48 सामन्यात 27 ची सरासरी आहे तर रहणेची मागील 53 सामन्यात 32 ची.तरी आफ्रिकेत त्या दोघांना खेळवण्याचा निर्णय चूक नव्हता असे वाटते.नवीन बॅट्समनना श्रीलंके विरुद्ध येणाऱ्या घरेलू सामन्यात घेऊन स्थिर करावे आणि मग मोठ्या आव्हानांना सामोरे जायला सिद्ध करावे.


आफ्रिकेत संघात बदल करायचाच होता तर अश्विनच्या जागेवर अय्यर किंवा विहारी ही निवड योग्य झाली असती असे वाटते.त्या ग्रीन टॉप्स वर सहा डावात अश्विनला फक्त 64 ओव्हर्स टाकायला मिळाल्या आणि त्यात त्याने 3 विकेट्स घेतल्या.2019 पासून कंडिशन्स प्रमाणे करेक्ट 11 खेळाडू आपल्याला निवडता येत नाहीयेत हे आश्चर्यच आहे.


डीन एल्गारच्या विजीगीषु वृत्तीला सलाम.त्याने ड्रेसिंग रम मध्ये खेळाडूंना प्रेरणेचे जबरदस्त इंजेक्शन दिले होते.किगन पिटर्सन आणि यैन्सन हे सिरीजचे हिरो म्हणता येतील.


एकूण संस्कृती,भाषा,पोशाख यांच्या विविधते मुळे ज्या देशाला  'रेन बो' नेशन म्हणले जाते त्या देशाने क्रिकेट मधील विविध गुणांच्या इंद्रधनुष्याने भारताचा वारू रोखला आणि भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले. वेल प्लेड साऊथ अफ्रिका!