IND vs SA: रहाणे-पुजारा नाही तर हा खेळाडू ठरतोय फ्लॉप!
या दोघांशिवाय एक असा फलंदाज आहे जो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फ्लॉप ठरतोय.
केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत टीम इंडियाने 70 रन्सची आघाडी घेतलीये. भारतीय फलंदाजांमध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा अतिशय खराब फॉर्ममध्ये आहेत. मात्र या दोघांशिवाय एक असा फलंदाज आहे जो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फ्लॉप ठरतोय.
भारताचा ओपनर मयंक अग्रवाल दक्षिण आफ्रिका दौऱ्यात साजेशी कामगिरी करू शकला नाही. तिन्ही सामन्यात त्याला चांगला खेळ करता आला नाहीये. त्यामुळे रोहित शर्माचं कसोटीत पुनरागमन झाल्यावर मयंतचा पत्ता कट होणार असल्याची चिन्ह आहेत.
मयंकला ओपनर म्हणून टीमला कधीच सुरळीत सुरुवात करता आली नाही, त्यामुळे मागून येणाऱ्या फलंदाजांवर दबाव वाढतो. इतकंच नाही तर मयंक दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोरही तो टिकू शकलेला नाही.
मयंक अग्रवालला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील 6 डावात केवळ एकच अर्धशतक करता आलंय. तिसऱ्या कसोटी सामन्यात चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. पण पहिल्या डावात तो केवळ 15 रन्स आणि दुसऱ्या डावात 7 रन्स करू शकला.
अनेक युवा खेळाडूंनी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीये. शुभमन गिल, पृथ्वी शॉ यांच्यासारखे उत्तम सलामीवीर संधीच्या शोधात आहेत. अशा स्थितीत मयंकच्या करिअरवर टांगती तलवार आहे.
मयंक अग्रवालने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने भारतासाठी 17 कसोटी सामन्यांमध्ये 1300 हून अधिक रन्स केलेत. यामध्ये चार शतकांचा समावेश आहे.
अग्रवालने 5 वनडेमध्ये 86 रन्स केले आहेत. आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्जकडून खेळतो. दरम्यान कएल राहुलच्या जाण्यानंतर पंजाबच्या टीमचा कर्णधार होण्याचा तोच सर्वात मोठा दावेदार आहे.