IND vs SL : चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणेला पुन्हा श्रीलंका दौऱ्यात संधी मिळणार?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अत्यंत वाईट कामगिरी केल्यानंतर आता पुन्हा पुजारा-रहाणेला संधी दिली जावी का?
मुंबई: गेल्या एक ते दीड वर्षापासून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावरील दबाव वाढत आहे. या दोघांची संघातील कामगिरी अत्यंत वाईट आहे. त्याचा परिणाम टीम इंडियाला भोगावा लागत आहे. त्यामुळे पुढच्या कसोटी सामन्यात या दोघांना संधी द्यावी की नाही यावर सध्या चर्चा सुरू आहेत.
अजिंक्य रहाणे-चेतेश्वर पुजारा दोघांनाही विराट कोहलीनं कायम आपल्या कर्णधारपदाच्या काळात संधी दिली आणि सपोर्टही केला. मात्र आता या दोघांचं काय होणार असा प्रश्न आहे. नवा कर्णधार आणि निवड समिती यांना पुन्हा दुसरी संधी देणार का? यावर अनेक मतमतांतरं सध्या समोर येत आहेत.
आता क्रिकेटपटू हरभजन सिंगने युट्यूब चॅनलवर आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्याने पुन्हा पुजारा आणि रहाणेला संधी दिली जाणार की नाही यावर देखील आपलं मत मांडलं आहे. शिवाय आता त्यांना धोका नव्या उमद्या खेळाडूंकडून असल्याचंही हरभजनने म्हटलं आहे.
मयंक अग्रवालने देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दिलेल्या संधीचं सोनं केलं नाही. तीन सामन्यांमधील 6 डावामध्ये त्याला पाहिजे तेवढी चांगली कामगिरी करता आली नाही. याशिवाय पुजारा आणि रहाणेनी चांगली कामगिरी केली नाही.
पुजारा आणि रहाणेला आता संघातील स्थान टिकवणं कठीण आणि आव्हानात्मक असणार आहे. 'राहाणे आणि पुजाराने जोहान्सबर्गमध्ये 50 धावा केल्या, पण सीनियर्स खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्यांची कामगिरी विशेष राहिली नाही. त्यामुळे आता इथुन पुढचा रस्ता जास्त कठीण आणि आव्हानात्मक असेल असं मत भज्जीने व्यक्त केलं आहे.
सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर सारखे खेळाडू संधीची वाट पाहत आहेत. त्यामुळे श्रीलंका कसोटी सीरिजमध्ये या खेळाडूंना संधी मिळणार का? की पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेला संधी दिली जाणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 25 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सीरिज सुरू होणार आहे.