मुंबई: टीम इंडियाची एक टीम 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका देखील 4 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने विराटसेना पूर्णपणे तिथल्या खेळाकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. तर दुसरीकडे जुलै महिन्यात श्रीलंके विरुद्ध सामन्याची तयारी देखील टीम इंडिया करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका विरुद्ध भारत जुलै महिन्यात 3 वन डे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. याचे संकेत BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वीही दिले होते. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध सामने कोरोनामुळे खेळवण्यात आले नाहीत. यंदा हे सामने जुलै महिन्यात होणार आहेत. 


भारत विरुद्ध श्रीलंका वन डे सामने 13, 16, 19 जुलै रोजी तर टी 20 सामने 22 ते 27 जुलै दरम्यान होणार आहेत. 5 जुलैला टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाईल तर 28 जुलै रोजी खेळाडू मायदेशी परत येतील अशी सध्या तरी माहिती आहे. 


टीम B च्या कोचची जबाबदारी राहुल द्रविड यांच्या खांद्यावर 


सीनियर म्हणजेच टीम A सोबत कर्णधार विराट कोहलीच्या टीम सोबत कोच रवी शास्त्री इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. तर B टीम सोबत राहुल द्रविड जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास हे नाव निश्चित झालं असून अधिकृत घोषणा अद्याप बाकी असल्याची माहिती मिळाली आहे. 


टीममध्ये कोणकोण असू शकतं?


पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार नवदीप सैनी, खलील अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यासरख्या खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. तर कर्णधारपदाची धुरा गब्बर म्हणजेच शिखर धवनच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे.