Ind vs WI: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. भारतीय संघ पहिल्या डावात 438 धावांवर ऑल आऊट झाला आहे. दरम्यान वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 86 धावा केल्या आहेत. त्यांनी एक विकेट गमावली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघ हॉटेलसाठी रवाना होत असताना एक भावनिक क्षण सर्वांना अनुभवण्यास मिळाला. वेस्ट इंडिजचा विकेटकिपर जोशुआ दा सिल्वाच्या (Joshua Da Silva) आईने विराट कोहलीची (Virat Kohli) भेट घेतली. यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी अत्यंत आपुलकीने विराट कोहलीची भेट घेतली. त्यांनी मुलाप्रमाणे विराटची गळाभेट घेतली. इतकंच नाही तर त्याच्या गालावर चुंबनही घेतलं. दोघांमध्ये बराच वेळ गप्पा सुरु होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच विराट कोहली आणि जोशुआ दा सिल्वा यांचा एक व्हिडीओ चर्चेत आला होता. या व्हिडीओत जोशुआ दा सिल्वाने आपली आई क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये येणार असल्याचं विराटला सांगितलं होतं. विराट आणि जोशुआ दा सिल्वामधील संभाषण स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालं होतं. विराट कोहलीलाही हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं होतं. 


जोशुआ दा सिल्वाने सामन्यात जे सांगितलं होतं, ते खऱं झालं आणि त्याची आई विराटला भेटण्यासाठी पोहोचली. दरम्यान, यावेळी विराटही त्यांच्या फार आपुलकीने बराच वेळ गप्पा मारत होता. दरम्यान, जोशुआ दा सिल्वाच्या आईने ज्याप्रकारे विराटवर प्रेमाचा वर्षाव केला ते पाहता त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. 



सामन्याची सध्याची स्थिती काय?


दुसऱ्या दिवशी विराट कोहली आणि आर अश्विनने जोरदार फलंदाजी केली. भारतीय संघ 438 वर ऑल आऊट झाला. विराट कोहलीने 206 चेंडूत 121 धावा ठोकल्या. तसंच आपलं 76 वं शतक पूर्ण केलं. कसोटी करिअरमधील हे त्याचं 29 वं शतक आहे. दुसरीकडे आर अश्विनने 56 धावा ठोकत 400 चा पल्ला गाठण्यात मदत केली. अश्विनने टेस्ट करिअरमधील 14 वं अर्धशतक केलं. रवींद्र जाडेजाने 61 धावा केल्या. ईशान किशन मात्र फक्त 25 धावाच करु शकला आणि तंबूत परतला. 


दुसरीकडे वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 86 धावा केल्या आहेत. कर्णधार क्रेग ब्रेथवेट 37 आणि पदार्पण करणारा किर्क मैकेंजी 14 धावांवर नाबाद आहेत. वेस्ट इंडिजने तेजनारायण चंद्रपॉलच्या रुपात एक विकेट गमावली आहे. रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. 


पण दुसरा दिवस हा फक्त विराट कोहलीने गाजवला. 87 धावांवर मैदानात उतरलेल्या विराटने केमार रोचच्या गोलंदाजीवर चौकार लगावत शतक पूर्ण केलं. विदेशी मैदानात डिसेंबर 2018 (ऑस्ट्रेलियाविरोधात पर्थ मैदानात) नंतर लगावलेलं हे कोहलीचं पहिलं शतक आहे. तसंच विराट कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमधील हा 100 वा सामना आहे. विराट कोहली 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.