Ind vs WI T20: वेस्ट इंडिजच्या (West Indies) दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. याचं कारण सध्या दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका सुरु असून, वेस्ट इंडिजने सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव केला. भारताने सलग दोन सामने गमावले असल्याने भारतीय चाहते आश्चर्य व्यक्त करत असून, वर्ल्डकपच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  दुबळा संघ समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताचा सलग पराभव करणं मोठा धक्का आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या कामगिरीवर फक्त चाहतेच नाही तर माजी भारतीय खेळाडूही नाराज झाले आहेत. भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 7 गडी गमावत 152 धावा केल्या होत्या. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव हे लवकर बाद झाले होते. यानंतर तिलक वर्मा आणि इशान किशनने डाव सावरला होता. पण भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरला.  


वेस्ट इंडिजने 18.5 ओव्हरमध्येच 8 गडी गमावत लक्ष्य पूर्ण केलं आणि विजय साकारला. निकोलस पूरन याने 40 चेंडू 67 धावा ठोकत आक्रमक खेळी केली. यानंतर अकीलने हुसैनने केलेल्या नाबाद 16 धावा आणि अल्झारी जोसेफने केलेल्या नाबाद 10 धावा यांनी दिलेल्या योगदानामुळे वेस्ट इंडिजने 2 गडी राखत हा सामना जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिजने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. 


इरफान पठाणचं ट्वीट 


भारताच्या पराभवानंतर इरफान पठाणने ट्वीट करत एका गोष्टीबाबत आश्चर्य व्यक्त केलं. "मला आश्चर्य वाटत आहे की, चहलने दोन्ही सामन्यात आपला 4 षटकांचा कोटा पूर्ण केला नाही".



पहिल्या टी-20 सामन्यात चहलने 3 षटकं टाकली होती. यावेळी त्याने 24 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या टी-20 सामन्यातही चहलला 4 षटकं पूर्ण करण्याची संधी देण्यात आली नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यातही त्याने 3 षटकंच टाकली. या सामन्यातही त्याने 2 विकेट घेतल्या. अशा स्थितीत चहलला 4 षटकं टाकू न देण्याच्या हार्दिक पांड्याच्या निर्णयावर इरफान पठाणने आश्चर्य व्यक्त केलं आहे. 


दुसऱ्या टी-20 सामन्यात चहलने 16 व्या ओव्हरला 2 विकेट्स मिळवत सामना भारताच्या बाजूने फिरवला होता. पण 18 वं आणि 19 वं षटक त्याला देण्यात आलं नाही. यावरुन कर्णधार हार्दिक पांड्यावर टीका होत आहे. ज्या गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलं होतं, त्याला पुन्हा गोलंदाजी करण्याची संधी का देण्यात आली नाही अशी विचारणा चाहते आणि माजी खेळाडू करत असून, आश्चर्य व्यक्त करत आहेत. 


युजवेंद्र चहलने 16 व्या षटकात  2 विकेट्स घेत भारताला पुन्हा सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली होती. पण अलजारी जोसेफ आणि अकील हुसैन यांनी 26 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचं स्वप्न भंगलं. वेस्ट इंडिजला शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये 12 धावांची गरज होती. पण कर्णधार हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी करणाऱ्या चहलकडे चेंडू न सोपवत मोठी चूक केली अशी टीका होत आहे.