Ind vs WI T20: वेस्ट इंडिजविरोधातील टी-20 मालिकेत सलग दोन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर भारताने अखेर पुनरागमन केलं आहे. भारताने तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) 7 गडी राखत पराभव करुन मालिकेतील आव्हान कायम ठेवलं आहे. 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजने 2 आणि भारताने 1 सामना जिंकला आहे. दरम्यान पहिल्या दोन सामन्यातील खराब कामगिरीमुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) जोरदार टीका करण्यात आली होती. पण तिसऱ्या सामन्यात विजय मिळवूनही हार्दिक पांड्यावर टीका केली जात असून, यावेळी मात्र कारण वेगळं आहे. नेटकरी हार्दिक पांड्यावर चिडले असून त्याला स्वार्थी म्हणत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने 18 व्या ओव्हरमध्येच हा सामना जिंकला. भारताने 3 गडी गमावले होते. हार्दिक पांड्याने षटकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताने सामना जिंकला तेव्हा 13 चेंडू अद्यापही शिल्लक होते अन् दुसऱ्या बाजूला तिलक वर्माला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त एका धावेची गरज होती. 


पॉवेल 18 वी ओव्हर टाकत होता. यावेळी 14 चेंडूवर 2 धावांची गरज असताना हार्दिक पांड्या स्ट्राइकवर होता. दुसरीकडे 49 धावांवर तिलक वर्मा होता. यावेळी हार्दिक पांड्याने षटकार लगावला आणि विजय मिळवून दिला. 



दरम्यान हार्दिक पांड्याच्या या कृतीने चाहते मात्र संतापले आहेत. भारताकडे 13 चेंडू शिल्लक असतानाही हार्दिक पांड्या षटकार न मारता तिलक वर्माला स्ट्राइक देत अर्धशतक पूर्ण करण्याची संधी देऊ शकला असता असं अनेकजण म्हणत आहेत. अनेकांनी तर त्याला स्वार्थी म्हटलं आहे. 



ट्विटरवर हार्दिक पांड्यावर अनेकांनी टीका केली असून, काहींनी त्याला महेंद्रसिंग धोनी आणि संजू सॅमसन यांनी अशा स्थितीत काय केलं होतं याची आठवण करुन दिली आहे. आयपीएलमध्ये संजू सॅमसनने जैसवालला शतक पूर्ण करता यावं यासाठी वाईडला जाणारा चेंडू अडवला होता. तर धोनीने विराटला विजयी फटका मारण्याची संधी दिली होती. 



तिलक वर्मा याने या मालिकेतून टी-20 मध्ये पदार्पण केलं आहे. भारतीय संघात तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये तिलक वर्माने 39, 51 आणि 49 धावा केल्या आहेत. 



दरम्यान या सामन्यात पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवने आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली. सूर्यकुमारने फक्त 44 चेंडूत 83 धावा ठोकल्या. यामध्ये 10 चौकार आणि 4 षटकार होते. सामन्यानंतर हार्दिक पांड्यानेही सूर्यकुमारचं कौतुक केलं. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे.