गेलच नाही, तर विराटनेही मोडलं लाराचं रेकॉर्ड
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये क्रिस गेलने ब्रायन लाराचा विक्रम मोडला.
पोर्ट ऑफ स्पेन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये क्रिस गेलने ब्रायन लाराचा विक्रम मोडला. क्रिस गेल वनडेमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला आहे. त्याशिवाय या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. पण यातल्या एका रेकॉर्डची चर्चा फारशी झाली नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मॅचमध्ये विराटने १२५ बॉलमध्ये १२० रन केले, यामध्ये १४ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. विराटचं वनडे क्रिकेटमधलं हे ४२वं शतक होतं. याचबरोबर विराट कोहली वेस्ट इंडिजमध्ये एका वनडेत सर्वाधिक रन करणारा कर्णधार बनला. याआधी हा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर होता.
२००३ साली लाराने श्रीलंकेविरुद्ध ११६ रनची खेळी केली होती. कोणत्याही कर्णधाराचा वेस्ट इंडिजमधला हा सर्वाधिक स्कोअर होता. या यादीत महेला जयवर्धने तिसऱ्या क्रमांकावर आहे. २००५ साली न्यूझीलंडविरुद्ध जयवर्धनेने नाबाद ११५ रन केल्या होत्या.
विराट कोहलीने श्रेयस अय्यरसोबत केलेल्या पार्टनरशीपमुळे भारताने ५० ओव्हरमध्ये २७९ रनपर्यंत मजल मारली. या मॅचमध्ये टीम इंडियाचा ५९ रननी विजय झाला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या य मॅचमध्ये ७८ रन करून विराटने सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं. गांगुलीने ३११ वनडे मॅचच्या ३०० इनिंगमध्ये ११,३६३ रन केले, तर कोहलीने फक्त २३८ वनडे मॅचच्या २२९ इनिंगमध्ये ११,४०६ रनचा टप्पा गाठला. भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या सचिनने ४६३ मॅचच्या ४५१ इनिंगमध्ये १८,४२६ रन केल्या.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या वनडेमध्ये विराटने जावेद मियांदादचा २६ वर्ष जुना विक्रमही मोडित काढला. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम विराटने केला आहे. मियांदादने वेस्ट इंडिजविरुद्ध १९३० रन केले होते. या इनिंगमध्ये १९ रन करताच विराटने मियांदादला मागे टाकलं.