मुंबई : टाय झालेली दुसरी वनडे आणि तिसऱ्या वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारतीय टीमनं घेतला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा तब्बल २२४ रननं विजय झाला आहे. भारताचा हा वेस्ट इंडिजविरुद्धचा सगळ्यात मोठा विजय आहे. रोहित शर्मा, अंबाती रायुडू आणि खलील अहमद भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या भारतानं ५० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून ३७७ रनचा डोंगर उभा केला. भारताकडून रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूनं शानदार शतक केलं. रोहितचं हे वनडेमधलं २१वं तर अंबाती रायुडूचं तिसरं शतक होतं. रोहितनं १३७ बॉलमध्ये १६२ रनची खेळी केली. यामध्ये २० फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. रायुडूनं ८१ बॉलमध्ये १०० रन केले. यामध्ये ८ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३७८ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सुरुवातीपासूनच भारतीय बॉलरनी त्यांना धक्के दिले. भारताचा युवा फास्ट बॉलर खलील अहमद सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. खलीलनं ५ ओव्हरमध्ये फक्त १३ रन देऊन ३ विकेट घेतल्या. कुलदीप यादवलाही ३ विकेट मिळाल्या. तर रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारला १-१ विकेट मिळाली. वेस्ट इंडिजचे २ बॅट्समन रन आऊट झाले.


५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं २-१नं आघाडी मिळवली आहे. आता सीरिज बरोबरीमध्ये सोडवण्यासाठी वेस्ट इंडिजला शेवटची पाचवी वनडे जिंकणं आवश्यक आहे.  १ नोव्हेंबरला तिरुअनंतपुरममध्ये पाचवी वनडे होणार आहे.


२०१८ सालचा चौथा मोठा विजय


२०१८ साली खेळण्यात आलेल्या वनडेतला हा चौथा सगळ्यात मोठा विजय आहे. यावर्षीच्या सगळ्यात मोठ्या विजयाची नोंद पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्ताननं झिम्बाब्वेचा २४४ रननं पराभव केला होता. यावर्षी ४ टीमनी २०० पेक्षा जास्त रननी विजय मिळवला होता. आता हे रेकॉर्ड करणारा भारत पाचवा देश बनला आहे.


भारताचा १३वा विजय


भारतानं यावर्षी १९ मॅच खेळल्या. यातल्या १३ मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर ४ मॅचमध्ये पराभव आणि २ मॅच टाय झाल्या. २०१८ साली सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टीममध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडनं यावर्षी सर्वाधिक १७ मॅच जिंकल्या आहेत. पण इंग्लंडनं भारतापेक्षा ५ मॅच जास्त खेळल्या आहेत. यावर्षी झिम्बाब्वेचा सर्वाधिक मॅचमध्ये पराभव झाला आहे. २०१८ साली झिम्बाब्वेनं २६ मॅच खेळल्या. यातल्या २० मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.