हॅमिल्टनमध्ये भारताची खराब कामगिरी, रेकॉर्ड सुधारण्याचं आव्हान
न्यूझीलंडविरुद्धची ५ वनडे मॅचची सीरिज भारतानं आधीच ३-०नं खिशात टाकली आहे.
हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धची ५ वनडे मॅचची सीरिज भारतानं आधीच ३-०नं खिशात टाकली आहे. आता या सीरिजची चौथी मॅच गुरुवार ३१ जानेवारीला हॅमिल्टनमध्ये होईल. विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे भारत रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरेल. पण हॅमिल्टनमधली भारताची याआधीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या मैदानात भारतानं आत्तापर्यंत ९ वनडे मॅच खेळल्या आहेत. यातल्या ३ मॅचमध्ये भारताचा विजय झालाय, तर ६ मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं याच मैदानात आयर्लंडचा पराभव केला होता. तर या मैदानात भारतानं न्यूझीलंडविरुद्ध एक आणि झिम्बाब्वेविरुद्ध १ मॅच जिंकली आहे.
न्यूझीलंडनं या मैदानात २८ मॅच खेळल्या आहेत. यातल्या १९ मॅचमध्ये त्यांचा विजय झालाय. तर भारत-न्यूझीलंडमध्ये या मैदानात एकूण ५ मॅच झाल्या. यातल्या ४ मॅच न्यूझीलंडनं आणि एक मॅच भारतानं जिंकली. २००९ साली भारतानं न्यूझीलंडचा ८४ रननी पराभव केला होता.
हॅमिल्टनच्या मैदानात भारताची कामगिरी याआधी खराब झाली असली, तरी सध्याच्या फॉर्ममुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असेल. भारतीय टीममनं माऊंट माउनगुनईमध्ये पहिल्यांदाच मॅच खेळल्या आणि विजय मिळवला. तसंच याआधी २००९ साली भारत न्यूझीलंडमध्ये वनडे सीरिज जिंकला होता. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वात भारताचा ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये ३-१नं विजय झाला होता. त्या सीरिजमधली पहिली, तिसरी आणि चौथी मॅच भारतानं जिंकली होती, तर पाचव्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा विजय झाला होता. सीरिजची दुसरी मॅच पावसामुळे रद्द झाली होती.
हॅमिल्टनमधली रेकॉर्ड
१ या मैदानात सगळ्यात कमी स्कोअर भारताच्या नावावर आहे. न्यूझीलंडनं २००३ साली भारताला १२२ रनवर ऑल आऊट केलं होतं.
२ या मैदानात सर्वाधिक स्कोअर वेस्टइंडिजनं केला आहे. २०१४ साली त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध ३६३/४ एवढा स्कोअर केला होता.
३ या मैदानात सगळ्यात मोठा विजयही वेस्टइंडिजच्या नावावर आहे. २०१४ साली त्यांनी न्यूझीलंडचा २०३ रननी पराभव केला होता.
४ विकेटच्या बाबतीत या मैदानातला सगळ्यात मोठा विजय न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडनं २००८ साली इंग्लंडला १० विकेटनी हरवलं होतं.
५ या मैदानात सर्वाधिक रन करण्याचं रेकॉर्ड रॉस टेलरच्या नावावर आहे. टेलरनं या मैदानात १७ मॅचमध्ये ५१.७८ च्या सरासरीनं ७२५ रन केल्या आहेत.
६ या मैदानात सगळ्यात मोठी खेळी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडननं केली होती. हेडननं २००७ साली १८१ रनची खेळी केली होती.
७ या मैदानात सर्वाधिक तीन शतकं रॉस टेलरनं केली आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि शिखर धवन यांनीही या मैदानात शतक केलं आहे.
८ या मैदानात सर्वाधिक १३-१३ विकेट घेण्याचं रेकॉर्ड ट्रेन्ट बोल्ट आणि टीम साऊदीच्या नावावर आहे. भारताच्या मोहम्मद शमीनं या मैदानात ७ विकेट घेतल्या आहेत.
९ या मैदानात सर्वाधिक मॅच खेळण्याचं रेकॉर्ड रॉस टेलरच्या नावावर आहे. टेलरनं या मैदानात १७ मॅच खेळल्या आहेत. ब्रॅण्डन मॅक्कलमनं या मैदानात सर्वाधिक ८ वेळा कर्णधारपद भूषवलं होतं.