मुंबई : टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारताला वनडे क्रिकेटमध्येही पहिल्या क्रमांकावर जायची संधी आहे. पण भारताला पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी इंग्लंड आणि श्रीलंकेमधील वनडे सीरिज महत्त्वाची आहे. या सीरिजमध्ये श्रीलंकेनं इंग्लंडला हरवलं आणि भारतानंही वेस्ट इंडिजचा वनडे सीरिजमध्ये पराभव केला तर भारत वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये सध्या इंग्लंड १२७ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर तर भारत १२२ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि इंग्लंडनं त्यांच्या वनडे सीरिज जिंकल्या तर इंग्लंड १२८ पॉईंट्सवर आणि भारत १२३ पॉईंट्सवर जाईल, अशा परिस्थितीमध्ये आयसीसीच्या क्रमवारीमध्ये कोणताही फरक पडणार नाही. २१ ऑक्टोबरपासून भारत आणि वेस्ट इंडिजची ५ वनडे मॅचची सीरिज सुरु होणार आहे. तर श्रीलंका आणि इंग्लंडच्या वनडे सीरिजला आजपासून सुरुवात झाली आहे. 


आयसीसीनं घोषित केलेल्या वनडेच्या नव्या क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर बॉलरच्या यादीमध्ये भारताचाच जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे.


८८४ पॉईंट्ससह विराट बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा ८४२ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टॉप १० मध्ये शिखर धवनलाही जागा मिळाली आहे. शिखर धवन ८०२ पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.


बॉलरच्या यादीमध्ये जसप्रीत बुमराह ७९७ पॉईंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे. भारताचा स्पिनर कुलदीप यादव ७०० पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा राशीद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर युझवेंद्र चहल ११व्या क्रमांकावर आहे.