IndvsNZ : भारताच्या पराभवामुळे रोहितचा हा विक्रम हुकला
चौथ्या एकदविसीय सामन्यात भारत विजयी झाला असता, तर रोहित शर्माच्या नावे एक नवा विक्रम झाला असता.
हेमिल्टन : न्यूझीलंड विरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठीचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले. विराट कोहलीला बीसीसीआयने दिलेल्या विश्रांतीमुळे नेतृत्वाची धुरा रोहितला दिली आहे. आज (३१ जानेवारी) झालेल्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला. हा पराभव भारतासाठी लाजीरवाणा ठरला.
रोहितची विक्रम हुकला
न्यूझीलंड विरुद्धच्या आजच्या चौथ्या आणि ३ फेब्रुवारीला होणाऱ्या पाचव्या सामन्यासाठी संघाचे नेतृत्वपद रोहितकडे सोपवण्यात आले आहे. जर आज झालेल्या चौथ्या एकदविसीय सामन्यात भारत विजयी झाला असता, तर रोहित शर्माच्या नावे एक नवा विक्रम झाला असता. रोहित शर्माने मार्च २०१८ पासून १२ सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली. रोहितच्या नेतृत्वातील या १२ सामन्यांत भारतीय संघाचा सलग विजय झाला आहे.
विराट कोहलीने २०१७ साली त्याच्या नेतृत्वाखाली भारताला सलग १२ सामन्यात विजय मिळवून दिला होता. जर आज रोहितच्या नेतृत्वात झालेली मॅच भारताने जिकंली असती, तर रोहितने सलग १३ सामने जिंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला असता. सोबतच भारताला आपल्या नेतृत्वाखाली सलग विजय मिळवून देणाऱ्या यादीत रोहित शर्मा अव्वल क्रमावर पोहोचला असता.
रोहितचे सामन्याचे द्विशतक
मालिकेतील चौथा सामना हा रोहित शर्माच्या एकदिवसीय कारकीर्दितील २०० वा सामना ठरला. त्यामुळे हा सामना रोहितसाठी महत्वाचा होता. यासोबतच रोहित हा २०० सामने खेळणारा क्रिकेट विश्वातील ८० वा तर चौदावा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने २३ जून २००७ ला आयर्लंड विरुद्धात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.