मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन एकदिवसीय सामान्यातील शेवटचा एकदिवसीय सामन्याला मेलबर्न येथे सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. खेळ सुरु होऊन केवळ 2 बॉल टाकण्यात आले, तेव्हा पावसाच्या अडथळ्यामुळे काही मिनिटांसाठी खेळ थांबवावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडथळ्यानंतर खेळायला आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला झटका 8 धावसंख्या असताना भुवनेश्वरने ऍलेक्स कॅरीला कोहली च्या हाती झेलबाद केले. ऍलेक्स कॅरी 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजा सोबत एरॉन फिंचने डाव सांभळण्याचा प्रयत्नात असताना भुवनेश्वरने त्यांचे मनसुबे अपयशी ठरवले. भुवनेश्वरने अरॉन फिंचला 14 धावांवर पायचीत केले. यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या शॉन मार्शने उस्मान ख्वाजा सोबत तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. 


गेल्या सामन्यात शतकी कामगिरी केलेल्या शॉन मार्शला या सामन्यात मोठी पारी करता आली नाही. त्याला धोनीने  चहलच्या गोलंदाजीवर 39 धावांवर खेळत असताना यष्टीचीत केले. यानंतर आलेल्या पीटर हॅन्डसकॉम्बने उस्मान ख्वाजासोबत खेळीला सुरुवात केली. शॉन मार्शच्या पाठोपाठ उस्मान ख्वाजा देखील बाद झाला. चहलने त्याला स्वतच्या गोलंदीजीवर झेलबाद केले. ख्वाजा 34 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या मार्कस स्टोइनिस सोबत पीटर हॅन्डसकॉम्ब यांच्या मध्ये पाचव्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी झाली. मार्कस स्टोइनिस 10 धावा करुन बाद झाला. त्याला चहालने रोहित शर्माच्या हाती झेलबाद केले.


सहाव्या विकेटसाठी ग्लेन मॅक्सवेल आणि  पीटर हॅन्डसकॉम्बने 41 धावा जोडल्या. ग्लेन मॅक्सवेल मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर 26 धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाला नियमित अंतराने झटके बसत असताना पीटर हॅन्डसकॉम्ब मात्र धावपट्टीवर थांबून आपल्या संघासाठी एक एक धावा जोडल्या. पीटर हॅन्डसकॉम्बने 57 बॉलचा सामना करुन अर्धशतक लगावले. यानंतर झाए रिचर्डसन 16 धावांवर बाद झाला. त्याला चहलने बाहेरचा रस्ता दाखवला. या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी  45 धावांची भागीदारी झाली. 


चांगली कामगिरी करत असलेल्या पीटर हॅन्डसकॉम्बला आपल्या वैयक्तिक धावसंख्येत वाढ करता आली नाही. त्याला चहालने 58 धावांवर पायचीत केले. पीटर हॅन्डसकॉम्बच्या अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला भारताला 231 धावांच आव्हान देण्यास शक्य झाले. भारताकडून गोलंदाजी करताना युजवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 10 ओव्हरमध्ये अवघ्या 41 धावा देत  6 विकेट्स घेतल्या. तर  मोहम्मद शमीने-भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 


या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारताने प्रत्येकी 1-1 सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना निर्णायक ठरणार आहे. तसेच भारताला आतापर्यंत ऑस्ट्रेलियात द्विसंघ मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे हा सामना जिंकून ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे.