जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत
२०१४ मध्ये भारतीय संघाला या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते.
मुंबई: जागतिक बुद्धिबळ ऑलम्पियाड स्पर्धेत भारतीय बुद्धिबळ संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये भारतीय संघाला या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. मात्र, आता अंतिम फेरीत धडक मारल्याने भारताचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे.
भारताने उपांत्य फेरीत पोलंडच्या संघाचा पराभव केला. भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने निर्णायक सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे अंतिम फेरीतील भारताचे स्थान निश्चित झाले. आता रविवारी रशिया आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी अंतिम फेरीत भारताची गाठ पडेल.
उपांत्य फेरीत पोलंडविरुद्ध भारतीय संघ पिछाडीवर पडला होता. पहिल्या फेरीत भारतीय संघाचा २-४ असा पराभव झाला होता. मात्र, दुसऱ्या फेरीत भारतीय संघाने ४.५-१.५ असा दिमाखात विजय मिळवला. यानंतर टायब्रेकर सामन्यात ग्रँडमास्टर कोनेरु हम्पी हिने बाजी मारत भारताला २-१ असा विजय मिळवून दिला.
यंदा या स्पर्धेत एकूण १६३ देश सहभागी झाले होते. या स्पर्धेत नाशिकचा ग्रँडमास्टर विदीत गुजराथी भारतीय संघाचे नेतृत्त्व करत आहे. माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद याला पहिल्या फेरीत पराभवाचा झटका बसला होता. मात्र, दुसऱ्या फेरीत विश्वनाथन आनंदने जॅन-किर्झीस्टोफ डुडा याच्यावर ७८ चालींत विजय मिळवला. तर कर्णधार विदीत गुजराथी, डी. हरिका आणि कोनेरु हम्पी यांनीही आपापल्या सामन्यांत विजय मिळवला. तर आर. प्रग्गानंधा याला पोलंडच्या इगोर जानिककडून पराभव स्वीकारावा लागला. तर वंतिका अग्रवाल आणि एलिसिजा सिल्विसिका यांचा सामना बरोबरीत सुटला.
पहिल्या फेरीत विश्वनाथन आनंदला डुडाकडून पराभव स्वीकाराला लागला होता. तर विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख यांनाही रॅडोस्लॉ आणि एलिसिजा सिल्विसिका यांनी हरवले होते. तर कोनेरु हम्पी आणि हरिका यांचे सामने बरोबरीत सुटले होते. मात्र, दुसऱ्या फेरीत भारतीय संघाने या पराभवाचा वचपा काढत अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली.