मुंबई : अंडर १७ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद यंदा भारताकडे सोपवण्यात आलं आहे. फिफाचे अध्यक्ष इंन्फेटिनो यांनी याविषयीची माहिती दिली. शुक्रवारीच ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली. 'आम्हास हे सांगण्यास आनंद होत आहे की, अंडर- १७ महिला फुटबॉल विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारताच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे', असं वक्तव्य करत त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. अमेरिकेतील मियामी येथे झालेल्या फिफाच्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फिफाच्या एखाद्या स्पर्धेचं भारतात आयोजन होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी अंडर १७ पुरूष फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचं आयोजनही भारताकडून करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सचिवपदी असणाऱ्या कुशल दास यांनी याविषयीच्या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. विश्वचषकाच्या आणखी एका स्पर्धेचं आयोजन भारतात करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत भारतात महिलांच्या फुटबॉल खेळाचा स्तर आणखी उंचावणार असल्याची आशा व्यक्त केली. फुटबॉल खेळात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी आपण गेल्या बऱ्याच काळापासून प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचाच परिणाम म्हणून ही संधी आपल्या वाट्याला आल्याचं म्हणत त्यांनी यजमानपद भूषवण्याची संधी मिळाल्याबद्दलल आनंद व्यक्त केला. 


भारतासोबतच फ्रान्सकडूनही फिफा अंडर १७ महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यासाठी स्वारस्य दाखवण्यात आलं होतं. गेल्या वर्षीपासूनच हे देश यजमानपदाच्या शर्यतीत होते. पण, यात भारतानेच बाजी मारली. दरम्यान, विश्वचषकाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या सामन्यांची ठिकाणं अद्यापही गुलस्त्यातच ठेवण्यात आली असून, येत्या काळात आणखी काही ठिकाणांची निश्चिती करण्यात येणार आहे. एकंदरच क्रीडा क्षेत्रात भारताच्या दृष्टीने सध्याच्या घडीला हा एक महत्त्वाचा टप्पा म्हटला जात आहे.