रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. भारताने एकदिवसीय मालिका ४-१ अशी सहजपणे जिंकली आहे. त्यामुळे टी-२०मध्ये भारत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागलेय. आजचा सामना झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये रंगणार आहे.  हा सामना संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरु होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्याने सुरुवात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेतील पराभव फुसून काढण्यासाठी भारताशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना रांची स्टेडियममध्ये रंगणार आहे.


आपल्या घरच्या मैदानात महेंद्रसिंग धोनी काय चमक दाखवतो,  याची उत्सुकता आहे. टी-२० संघात शिखर धवन, दिनेश कार्तिक आणि आशीष नेहरा यांचे पुनरागमन झाले आहे. ३८ वर्षीय आशीष नेहराला संघात पुन्हा स्थान दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. नेहराने २६ सामन्यांमध्ये ३४ बळी मिळवले आहेत.


नेहराला यावेळी युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची साथ मिळू शकेल. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी एकदिवसीय मालिकेत आपली निवड सार्थ ठरवली होती, त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा संघाला आहे. धवन रोहितच्या साथीने भारताच्या डावाची सुरुवात करील. बऱ्याच कालावधीनंतर तो भारतीय संघात आल्यावर कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष लागले आहे.


हार्दिक पंड्याने एकदिवसीय मालिका गाजवली होती. मालिकावीरचा पुरस्कारही त्याने पटकावला होता. त्यामुळे टी-२० सामन्यामध्ये तो आपली छाप पाडतो का, याची उत्सुकता आहे.


असा असणार संघ


भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.


ऑस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन बेहरेन्डॉर्फ, डॅन ख्रिस्तियन, नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स, अ‍ॅरोन िफच, ट्रेव्हिस हेड, मोइसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा.