India vs Australia, 3rd Test Day 1 : पहिला दिवस भारताचा, मयंकच्या पदार्पणाचा
पुजारा आणि मयंक अग्रवाल या खेळाडूंनी संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला.
मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही क्रिकेट संघांदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ ८९ षटकांनंतर संपला. पहिल्या दिवसअखेर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची धावसंख्या २ गडी बाद, २१५ धावा इतकी आहे.
पहिल्याच्या दिवसाच्या सुरुवातीलाल हनुमा विहारी आणि मयंक अग्रवाल या नव्या जोडीने भारती संघाच्या धावांचा श्रीगणेशा केला. पण, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजदीसमोर हनुमा विहारीला फार काळ तग धरता आला नाही. विहारी अवघ्या ८ धावांवरच बाद झाला. तो तंबूत परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल या खेळाडूंनी संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला.
सुरुवातीपासून अतिशय संयमी खेळी करणाऱ्या मयंक अग्रवालने पदार्पणाच्याच कसोटी सामन्यात अर्धशतक झळकवत लक्षवेधी खेळाचं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. मयंकच्या खेळाची क्रीडाविश्वातून बरीच प्रशंसा झाली. १६१ चेंडूंचा सामना करत नवख्या मयंकने ७६ धावांची भारताच्या धावसंख्येत भर घातली.
पहिल्या दिवशी गोलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाकडूनही भारतीय फलंदाजांवर चांगलाच मारा करणं सुरु होतं. यामध्ये पॅट कमिन्स हा खेळाडू आघाडीवर होता. पॅटनेच मयंकला ७६ धावांवर बाद करत त्याला तंबूत पाठवलं. पॅटच्या चेंडूवर झेलबाद झालेला मयंक तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने मोठ्या जबाबदारीने चेतेश्वर पुजाराची साथ देत भारतीय संघाची धावसंख्या २०० पलीकडे नेण्यास मदत केली.
८९ षटकांवर पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ घोषित केला. त्यावेळी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोन्ही खेळाडू अनुक्रमे ४७ आणि ६८ धावांवर बिनबाद होते. विराटला पहिल्या दिवशी त्याच्या २० व्या कसोटी अर्धशतकाने हुलकावणी दिली. अर्धशतकापासू अवघ्या तीन धावा दूर असणारा विराट आता दुसऱ्या दिवशी त्याची रनमशिन सुरु करतो का, याकडेच साऱ्यांचं लक्ष असेल. मुख्य म्हणजे पहिल्या चेंडूपासूनच विराटला कांगारुंनी लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. पण, त्यांचा हा मारा तो मोठ्या कौशल्याने परतनून लावत होता. विराट आणि पुजारा या दोघांकडूनही पहिल्या दिवसाच्या खेळात काही सुरेक स्ट्रोकही पाहायला मिळाले.