मेलबर्न : चेतेश्वर पुजारानं केलेलं शतक आणि भारताच्या इतर बॅट्समननी त्याला दिलेली साथ यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. चेतेश्वर पुजाराच्या शतकामुळे भारतानं दुसऱ्या दिवशी ४४३ रनवर डाव घोषित केला. पुजारानं २८० बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. ३१९ बॉलमध्ये १०६ रनची खेळी करुन पुजारा आऊट झाला. चेतेश्वर पुजाराचं टेस्ट क्रिकेटमधलं हे १७वं शतक होतं. या शतकाबरोबरच पुजारानं सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे. सौरव गांगुलीच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये १६ शतक आहेत. तर व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये १७ शतकं आहेत. लक्ष्मणचं रेकॉर्ड मोडण्यासाठी पुजाराला आता एकाच शतकाची गरज आहे.


पुजाराचं सगळ्यात संथ शतक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेतेश्वर पुजाराच्या टेस्ट कारकिर्दीमधलं हे सगळ्यात संथ शतक होतं. हे शतक पूर्ण करायला पुजाराला २८० बॉल लागले. पहिल्या दिवशी भारतीय टीमनं ८९ ओव्हरमध्ये २ विकेट गमावून २१५ रन केले होते. पहिल्या दिवशी पुजारानं ६८ रन करायला २०० बॉल घेतले होते. पुजारा बॅटिंगला आला तेव्हा भारताचा स्कोअर ४०/१ असा होता. अशा नाजूक स्थितीमध्ये चेतेश्वर पुजारानं बचावात्मक खेळ करून भारताला आणखी धक्का लागून दिला नाही. याआधी २०१२ साली मुंबईमध्ये इंग्लंडविरुद्ध पुजारानं २४८ बॉलमध्ये शतक केलं होतं.


ऑस्ट्रेलियात तिसरं संथ शतक


ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक बॉल खेळून शतक करणारा पुजारा तिसरा भारतीय बॅट्समन बनला आहे. सुनिल गावसकर यांनी १९८५ साली ऍडलेडमध्ये २८६ बॉलमध्ये आणि रवी शास्त्री यांनी सिडनीमध्ये १९९२ साली ३०७ बॉलमध्ये शतक केलं होतं. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये शतक करणारा पुजारा ५वा भारतीय बॅट्समन ठरला आहे.


ऍडलेड टेस्टमध्येही पुजाराचं शतक


याआधी ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्येही पुजारानं शतक केलं होतं. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये पुजारानं १२३ रनची खेळी केली होती. तर दुसऱ्या इनिंगमध्ये ७१ रन केले होते. यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये पुजाराला २४ आणि ४ रनच करता आल्या.