मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या वनडे सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये ओपनिंगला कोण बॅटिंग करणार? या प्रश्नाने भारतीय टीम प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. पण कर्णधार विराट कोहलीने मात्र रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल या तिघांना घेऊन खेळू शकतो, असे संकेत दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'खेळाडू फॉर्ममध्ये असणं टीमसाठी चांगली गोष्ट आहे. टीमसाठी सर्वोत्तम खेळाडू उपलब्ध असावा, असं प्रत्येकालाच वाटतं. तिन्ही ओपनरना घेऊन आम्ही खेळण्याची शक्यता आहे. मैदानात आम्ही कोणाला घेऊन उतरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल,' असं विराट म्हणाला.


'या तिघांना संधी दिली तर मी खालच्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन बलिदान देऊ शकतो. खालच्या क्रमांकावर बॅटिंग करताना मला आनंदच होईल. याच क्रमांकावर खेळण्यासाठी मी आग्रही नाही. कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करताना मला असुरक्षित वाटत नाही. कर्णधार म्हणून नवी पिढी तयार करणं हे माझं काम आहे,' असं विराट म्हणाला.


कोणाला संधी मिळणार?


विराटने सांगितल्याप्रमाणे रोहित, राहुल आणि शिखर हे तिन्ही खेळाडू मैदानात उतरले तर विराट चौथ्या क्रमांकावर खेळेल. विराट या क्रमांकावर खेळायला आला तर श्रेयस अय्यर पाचव्या, ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर आणि ऑल राऊंडर असलेला रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर खेळू शकतो. पण या टीमसह विराट मैदानात उतरला तर त्याच्याकडे बॉलिंगसाठी ५ पर्यायच उपलब्ध राहतात. अशात एखाद्या बॉलरला मॅचमध्येच दुखापत झाली तर विराटच्या अडचणी वाढू शकतात.


विराट कोहलीने गेल्या काही काळामध्ये केदार जाधवचा खालच्या फळीतला उपयुक्त बॅट्समन आणि गरज पडली तर सहावा बॉलर म्हणून वापर केला आहे. त्यामुळे केदार जाधवला खेळवलं तर मात्र श्रेयस अय्यरला बाहेर बसावं लागू शकतं. श्रेयस अय्यरचा गेल्या काही महिन्यांमधला फॉर्म बघता त्याला वगळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केएल राहुलला विकेट कीपर म्हणून संधी देऊन ऋषभ पंतला डच्चू देण्याचा विचारही विराट करु शकतो. राहुलला आयपीएलमध्ये विकेट कीपिंग करण्याचा अनुभव आहे.


बॉलरमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी हे तीन फास्ट बॉलर आणि कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहल यांच्यापैकी एक स्पिनरला विराट संधी देऊ शकतो. रवींद्र जडेजाच्या रुपात टीममध्ये स्पिनर ऑलराऊंडर असल्यामुळे टीममध्ये एकच स्पिनर खेळण्याची शक्यता जास्त आहे.