India Vs Australia: भारताचे `हे` 4 स्टार खेळाडू गायब! मात्र ऑस्ट्रेलिया पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार
India Vs Australia ODI Series: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरदरम्यान 3 सामने खेळवले जाणार असून या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया पूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार आहे.
India Vs Australia ODI Series: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघांने आशिया चषक 2023 ची स्पर्धा जिंकली. या विजयासहीत भारताने आठव्यांदा आशिया चषक पटकावला. आता वर्ल्डकप सुरु होण्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायभूमीमध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यामध्ये भारताचे 4 प्रमुख खेळाडू खेळणार नसल्याचं समजतं. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ संपूर्ण ताकदीने ही मालिका खेळणार आहे. त्यामुळेच भारताने 4 स्टार खेळाडूंना आराम का दिला आहे असा प्रश्न विचारला जात आहे.
हे 4 स्टार खेळाडू बाहेर
बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी जो 15 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे त्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांचा समावेश नाही. या चौघांनाही आराम देण्यात आला आहे. या सामन्यांमध्ये रोहितऐवजी के. एल. राहुल संघाचं नेतृत्व करणार आहे. रविंद्र जडेजाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्वीन, वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी भारताचा वेगळा संघ
बीसीसीआयने तिसऱ्या सामन्यामध्ये 17 सदस्यांचा संघ जाहीर केला असून त्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांनाही संधी देण्यात आली आहे. मात्र शेवटच्या सामन्यासाठी ते संघात नसतील. अश्वीन आणि वॉशिंग्टन सुंदरलाही तिसऱ्या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियन संघात दमदार खेळाडूंचा समावेश
दुसरीकडे वर्ल्डकप स्पर्धेचा विचार करुन ऑस्ट्रेलियन संघ मात्र पूर्ण ताकदीने ही मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतामध्येच विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 28 सप्टेंबरपर्यंत संघामध्ये शेवटचे बदल करण्याची संधी आयसीसीने दिली आहे. 18 सदस्यांच्या ऑस्ट्रेलियन टीमचं नेतृत्व कर्णधार पॅट कमिन्स करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये कमिन्स खेळला नव्हता. या संघामध्ये ट्रेविस हेडलाही जागा मिळालेली नाही. हेडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या म्हणजेच चौथ्या एकदिवसीय सामन्यामध्ये हाताला दुखापत झाली होती. हेडच्याऐवजी सलामीला मॅथ्यू शॉर्टला संघात स्थान मिळालं आहे. ऑस्ट्रेलिय संघामध्ये ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क यांनाही पुन्हा संघात संधी दिली आहे. हे तिन्ही खेळाडू जायबंदी असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळत नव्हते.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या एकदिवसीय मालिकांचा रेकॉर्ड
एकूण एकदिवसीय मालिका - 14
ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या मालिका - 8
भारताने जिंकलेल्या मालिका - 6
भारतामध्ये दोन्ही संघांनी खेळलेले एकदिवसीय सामने
एकूण सामने- 11
ऑस्ट्रेलियाने जिंकलेले सामने- 6
भारताने जिंकलेले सामने - 5
पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघ:
के.एल. राहुल (कर्णधार, विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल (दुखापतीमधून बरा झाला तर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ -
पॅट कमिन्स (कप्तान), सीन एबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मैथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, अॅडम जाम्पा.
कधी आणि कुठे खेळवले जाणार हे सामने?
पहिला वनडे सामना- 22 सप्टेंबर - मोहाली
दुसरा वनडे सामना- 24 सप्टेंबर - इंदूर
तीसरा वनडे सामना- 27 सप्टेंबर - राजकोट