मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचआधी भारताला दिलासा देणारी बातमी आहे. तिसऱ्या टेस्टसाठी रवींद्र जडेजा फिट असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये तिसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे. रवींद्र जडेजाचा डावा खांदा आता सुधारत आहे. त्यामुळे तो तिसऱ्या टेस्ट मॅचसाठी उपलब्ध असल्याचं बीसीसीआयनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं आहे. भारतात झालेल्या वनडे सीरिजपासून रवींद्र जडेजाच्या खांद्याला दुखापत झाली होती. २ नोव्हेंबरला जडेजाला मुंबईत इंजक्शन देण्यात आलं, आणि तो टेस्ट सीरिजसाठी फिट असल्याचं सांगण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिट झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजसाठी जडेजाची निवड करण्यात आली. पण क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ विरुद्धच्या सराव सामन्यामध्ये पुन्हा एकदा जडेजाच्या खांद्याच्या दुखापतीनं डोकं वर काढलं. त्यामुळे जडेजा पहिल्या २ टेस्ट खेळला नाही. पर्थमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या आधी रवींद्र जडेजानं नेटमध्ये सराव केला. पण नेहमीच्या तीव्रतेनं जडेजा बॉलिंग करत नसल्यामुळे त्याचा दुसऱ्या टेस्टसाठी विचार झाला नसल्याचं बीसीसीआयनं या प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आहे.


मग जडेजाला टीममध्ये का घेतलं?


पहिल्या टेस्ट मॅचवेळी आर.अश्विनला दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या टेस्टला तो मुकला. अश्विनऐवजी पहिल्या १३ खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाची टीममध्ये निवड करण्यात आली. पण आता रवींद्र जडेजाही पूर्ण फिट नसल्याचं वक्तव्य शास्त्रींनी केलं आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर चार दिवसांनी जडेजाला इंजक्शन दिलं गेल्याचा खुलासा शास्त्रींनी केला.


पर्थ टेस्टमध्ये भारत ४ फास्ट बॉलर घेऊन मैदानात उतरला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर नॅथन लायननं पहिल्या इनिंगमध्ये ५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३ विकेट अशा एकूण ८ विकेट घेतल्या होत्या.   


मग जडेजा फिल्डिंग का करत होता?


पर्थ टेस्टसाठी जडेजा पूर्णपणे फिट नसल्याचा दावा शास्त्री करत असले तरी पर्थ टेस्टमध्ये रवींद्र जडेजा बहुतेक वेळ फिल्डिंग का करत होता? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


रवी शास्त्रींची सारवासारव


जडेजाला दुखापतीतून सावरण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त वेळ लागल्याच रवी शास्त्री म्हणाले. एखादा बॉलर ५-१० ओव्हर टाकून पुन्हा बाहेर जायचा गोंधळ नको म्हणून आम्ही जडेजाला टीममध्ये घेतलं नसल्याचं शास्त्री म्हणाले. पर्थ टेस्ट सुरु व्हायच्या आधी जडेजा ७० ते ८० टक्केच फिट होता, त्यामुळे आम्ही जडेजाला खेळवण्याचा धोका पत्करला नसल्याचं वक्तव्य शास्त्रींनी केलं.