सिडनी : ६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. त्याआधी क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ आणि भारतीय टीममध्ये सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या ५ बॅट्समननी अर्धशतकं केली. यामध्ये पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांचा समावेश आहे. पण पृथ्वी शॉबरोबर ओपनिंगला आलेला केएल राहुल १८ बॉलमध्ये ११ रन करून आऊट झाला. सुरुवातीचे पाचही बॅट्समन अर्धशतक करत असताना राहुलला चांगली कामगिरी न करता आल्यामुळे भारताचे बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर नाराज दिसले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक वेळी केएल राहुल वेगवेगळ्या पद्धतीनं आऊट होतोय. केएल राहुल हा आता काही युवा खेळाडू नाही. त्यानं आत्तापर्यंत ३० टेस्ट खेळल्या आहेत. त्यानं जबाबदारीनं खेळावं आणि टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजवावी, अशी प्रतिक्रिया संजय बांगर यांनी दिली आहे. बांगर यांचं हे वक्तव्य म्हणजे केएल राहुलबद्दल भारतीय टीमनं दाखवलेला विश्वास आणि संयम कमी होत चालल्याचं मानलं जातंय.


आजही केएल राहुल चांगला खेळत होता पण प्रत्येकवेळी तो नवीन पद्धतीनं आऊट होतोय. आजही बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर होता आणि त्यानं शरिरापासून लांब राहुन बॉल खेळला, त्यामुळे त्याला विकेट गमवावी लागली. राहुल फक्त एका चांगल्या खेळीपासून लांब आहे, असं मत बांगरनं व्यक्त केलं.


इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टेस्टमध्ये केएल राहुलनं शतक करत टीममधली त्याची जागा पक्की केली. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्टमध्ये मिळालेल्या संधीचं राहुलला सोनं करता आलं नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही टेस्टमध्ये राहुल ० आणि ४ रनवर आऊट झाला.


ऑस्ट्रेलियाकडे स्टार्क, हेजलवूड आणि कमिन्स हे फास्ट बॉलर आणि नॅथन लायन हा अनुभवी स्पिनर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या या भेदक बॉलिंगपुढे भारतीय टीम पृथ्वी शॉबरोबर ओपनिंगला राहुलला संधी देणार का पुन्हा मुरली विजयवर विश्वास टाकणार हा खरा प्रश्न आहे. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे मुरली विजयला इंग्लंड दौऱ्याच्या मध्येच डच्चू देण्यात आला होता. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीमनं शिखर धवनला वगळून पुन्हा मुरली विजयला संधी दिली आहे. त्यामुळे ओपनिंगला कोणाला पाठवायचं हा मोठा प्रश्न भारतीय टीमपुढे असणार आहे.


विहारी का रोहित? का कोणीच नाही?


पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीम रविंद्र जडेजा किंवा अश्विनला ऑल राऊंडर म्हणून खेळवणार का विहारी किंवा रोहितपैकी एकाला सहाव्या क्रमांकावर संधी देणार याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हलमध्ये झालेल्या टेस्टमध्ये हनुमा विहारीला संधी देण्यात आली होती. त्या मॅचमध्ये विहारीनं अर्धशतक केलं होतं. हनुमा विहारी हा ऑफ स्पिन बॉलिंगही करतो. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये विहारीला संधी देण्यात आली नाही. रोहित शर्माकडे असलेल्या २५ टेस्टच्या अनुभवामुळे त्यालाही पहिल्या टेस्ट मॅचमध्ये संधी मिळू शकते.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी पहिल्या आणि सहाव्या क्रमांकाच्या खेळाडूंबद्दलचा निर्णय झालेला नसल्याचं वक्तव्य संजय बांगर यांनी केलं.