राजकोट : भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे आज राजकोटमध्ये होणार आहे. मुंबईमधला पहिला सामना गमावल्यानंतर आता भारतासाठी ही मॅच 'करो या मरो'ची आहे. या मॅचमध्ये पराभव झाला तर भारताला सीरिज गमवावी लागू शकते. ऑस्ट्रेलियाची ही टीम खूप मजबूत आहे आणि त्यांच्याविरुद्ध पुनरागमन करणं कठीण आव्हान असेल, असं विराट कोहली म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात लागोपाठ ४ वनडे मॅच गमावल्या आहेत. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी भारताने सीरिजच्या पहिल्या २ मॅच जिंकल्या, पण उरलेल्या तिन्ही मॅचमध्ये भारताला पराभवाचा धक्का लागला. यामुळे भारताने मागच्यावर्षी वनडे सीरिज ३-२ने गमावली होती. आजची मॅच गमावली तर भारत घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लागोपाठ २ सीरिज गमावेल.


राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट संघाच्या मैदानात दुपारी १.३० वाजता मॅचला सुरुवात होईल. पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताचा २५५ रनवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. ओपनर एरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी नाबाद शतकं केली.


दुसऱ्या वनडेमध्ये भारत ऋषभ पंतशिवाय मैदानात उतरणार आहे. पहिल्या वनडेमध्ये ऋषभ पंतला बॅटिंग करत असताना हेल्मेटला बॉल लागल्यामुळे दुखापत झाली होती. पंतऐवजी केएल राहुल विकेट कीपिंग करेल. त्यामुळे विराट केदार जाधव, मनिष पांडे किंवा शिवम दुबे यांच्यापैकी एकाला संधी देऊ शकतो. तसंच शार्दुल ठाकूरऐवजी नवदीप सैनीची टीममध्ये वर्णी लागू शकते.


पहिल्या वनडेमध्ये भारत तीन ओपनरना घेऊन खेळला होता. त्यामुळे शिखर धवन आणि रोहित शर्मा ओपनिंगला आणि केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता. यामुळे कोहली त्याच्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकाऐवजी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. पण ही रणनिती अयशस्वी झाल्याचं विराटने मान्य केलं, तसंच आपण पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येऊ, असे संकेतही दिले. 


भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर


ऑस्ट्रेलियाची टीम 


एरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, एश्टन टर्नर, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, जॉस हेजलवूड, केन रिचर्डसन, डाआर्सी शॉर्ट, मिचेल स्टार्क, एश्टन टर्नर, एडम झम्पा